भारताला ‘एरोस्पेस’मध्ये पहिल्या पाच देशांमध्ये सामील करण्याचे लक्ष्य

नवी दिल्ली – भारताला संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात जगातील पाच अग्रणी देशांमध्ये सामील करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हणाले. बुधवारी दिल्लीत पार पडलेल्या ‘एरो इंडिया’ २०२१च्या व्हर्च्युअल राऊडंदरम्यान राजनाथ सिंग बोलत होते. ‘जगभरात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'एरोस्पेस'

बुधवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विविध देशांच्या राजदूतांशी ‘एरो इंडिया’वर चर्चा केली. भारताने फोर्थ जनरेशन लढाऊ विमान, आण्विक पाणबुडी, युद्ध रणगाडा आणि आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे. जगात फार कमी देश आहेत ज्यांच्याकडे ही संरक्षण क्षमता आहे.त्यामध्ये भारत असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले.

भारताने एरोस्पेस क्षेत्रातल्या उत्पादनांच्या डिझाईनपासून खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या भागीदारीपर्यंत सर्वांमध्येच जगातील पहिल्या पाच देशांमध्ये स्थान प्राप्त करावे, असे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आल्याचे राजनाथ सिंग म्हणाले. फेब्रुवारी महिन्यात बंगळुरुमध्ये होणारा ‘एअरो इंडिया’ भारताला ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनविण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, मे महिन्यात केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरुन ७४ टक्क्यांवर केली होती. यामुळे देशात शस्त्र निर्मिती आणि संरक्षण साहित्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळाले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी भारताने रायफलपासून तोफापर्यंत १०१ संरक्षण साहित्यांच्या आयातीवर बंदी घातली. या सर्वांमुळे भारत संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भर होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो. तसेच भारताचे ‘मेक इन इंडिया’ बरोबरच ‘मेक फॉर वर्ल्ड’चे उद्दिष्ट असल्याचे काही दिवसांपूर्वीच संरक्षणमंत्री म्हणाले होते.

leave a reply