वायुसेनेची विमाने ‘बायो जेट’ इंधनावर उडणार

नवी दिल्ली – भारतीय वायुसेनेची विमाने भविष्यात ‘बायो जेट’ इंधनावर उड्डाण करतील. कौन्सिल ऑफ सायंटिफीक ऍण्ड इंडस्ट्रीयल रिसर्चच्या (सीएसआयआर) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (आयआयपी) या प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेले बायो जेट फ्यूअल लष्करी विमानांमध्ये वापरण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या इंधनाच्या चाचण्या सुरू होत्या. वायुसेनेने भारतात विकसित या बायो जेट इंधनाचा वापर करून गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात लेह सारख्या अतिउंचीवरील विमानतळावर लढाऊ विमानाचे उड्डाण व लॅण्डिंग केले होते.

वायुसेनेची विमाने ‘बायो जेट’ इंधनावर उडणारदोन दिवसांपूर्वी देहराडूनमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात सेंटर फॉर मिलेट्री एअरवर्थिनेस ऍण्ड सर्टिफीकेशनचे (सीईएमआयएलएसी) समूह संचालक आर. कमालकन्नन यांनी सीएसआयआर-आयआयपीचे प्रमुख संशोधक सलीम अख्तर फारुखी यांना उड्डाण योग्यता प्रमाणपत्र सुपूर्द केले. यावेळी वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आशीष श्रीवास्तव आणि विंग कमांडर ए. सचान उपस्थित होते. या प्रमाणपत्राबरोबर आता वायुसेना आपल्या विमानांमध्ये हे बायो जेट इंधन वापरू शकेल. त्यामुळे भारतीय संशोधकांनी विकसित केलेल्या या बायो जेट इंधनाचे व्यवसायिक उत्पादनही यामुळे सुरू होईल, असा दावा केला जात आहे.

काही ठराविक देशांना बायो जेट इंधन बनविण्यात यश मिळाले आहे. या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. २८ ऑगस्ट २०१८ सालात भारतात पहिल्यांदा या बायो जेट इंधनाचा वापर प्रवासी विमानात करण्याची चाचणी घेतली होती. त्यानिमित्ताने भारतात पहिल्यांदा बायो जेट इंधनाचा वापर विमानात करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसातच वायुसेनेच्या विमानातही या बायो जेट इंधनाचा वापर करण्याची चाचणी घेण्यात आली. २६ जानेवारी २०१९ च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील एएन-३२ ही मालवाहू विमाने बायो जेट इंधनाचा वापर करून उडविण्यात आली आणि भारताने इतिहास रचला होता. वायुसेनेची विमाने ‘बायो जेट’ इंधनावर उडणारत्यानंतर सातत्याने या बायो जेट इंधनाच्या चाचण्या सुरू आहेत.

३० जानेवारी २०२० रोजी वायुसेनेच्या ताफ्यातील रशियन बनावटीच्या लढाऊ विमानात या बायो जेट इंधनाचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे हे विमानाने लेह सारख्या अतिउंचीवरील धावपट्टीवर लॅण्डींग आणि टेकऑफ केले होते. त्यानंतर लवकरच हे भारतीय बनावटीचे बायो जेट इंधनाचा वापर करण्यास भारतीय संरक्षणदलांना मंजुरी मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. भारतीय वायुसेना, संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ), डायरेक्टोरेट जनरल ऑफ एअरोनॉटिक्स कॉलिटी एश्योरन्स (डीजीएक्यूए) आणि सीएसआयआर-आयआयपीच्या एकत्रित प्रयत्नातून हे बायो जेट इंधन विकसित करण्यात आले आहे. २०१८ साली तत्कालीन वायुसेनाप्रमुख बी.एस.धनोआ यांनी वायुसेनेच्या विमानातही या बायो जेट इंधनाचा वापर करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर चार महिन्यात थेट २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बायो जेट इंधनाचा वापर करून विमानांनी उड्डान केले होते. कार्बन उत्सर्जन कमी करणारे हे इंधन पर्यावरण पुरक आहे. यामुळे इंधनाचा मोठा खर्च कमी होईल. तसेच या जैव इंधनासाठी लागणार्‍या पीकांचे उत्पादन घेऊन देशात शेतकर्‍यांनाही यातून रोजगार मिळू शकेल, असा दावा केला जात आहे.

leave a reply