वायुसेनेने अल्पकाळ व दिर्घकाळ चालणाऱ्या युद्धासाठी सुसज्ज व्हावे -एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी

नवी दिल्ली – ‘भू-राजकीय उलथापालथी लक्षात घेता, वायूसेनेने अल्पकाळ चालणाऱ्या पण अत्यंत गतीमान अशा युद्धासाठी सुसज्ज राहण्याची आवश्यकता आहे. त्याचवेळी दीर्घकाळ चालू शकणाऱ्या युद्धासाठीही तयार राहणे भाग आहे’, असा संदेश वायुसेनाप्रमुख व्हीआर चौधरी यांनी दिला. युक्रेनच्या युद्धाचे पडसाद इंडो-पॅसिफिक क्षेत्रात उमटतील, असे इशारे नुकत्याच पार पडलेल्या रायसेना डायलॉगमध्ये युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर, वायुसेनाप्रमुखांनी दिलेला हा संदेश लक्ष वेधून घेणारा ठरतो.

छोट्या अर्थात अल्पकाळासाठी चालणाऱ्या पण अतिशय गतीमान हालचाली कराव्या लागणाऱ्या युद्धासाठी वायुसेनेने सज्ज रहावे. अशा युद्धात शत्रूच्या कारवायांना प्रतिसाद देण्यासाठी आपल्याकडे फार मोठा अवधी नसेल. अत्यल्प वेळेत कारवाई करण्याची क्षमता वायुसेनेला अधिक विकसित करावी लागेल, असा संदेश वायुसेनाप्रमुखांनी दिला. त्याचवेळी पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर निर्माण झालेला तणाव लक्षात घेता, दीर्घकाळ चालूशकणाऱ्या संघर्षाची तयारी आपण ठेवायला हवी, असे वायुसेनाप्रमुख चौधरी पुढे म्हणाले.

अलीकडच्या काळातील भारतीय वायुसेनेचा अनुभव तसेच भू-राजकीय पातळीवरील घडामोडी पाहता, कुठल्याही क्षणी पेट घेऊ शकणाऱ्या संघर्षासाठी आपण तयार असले पाहिजे. यासाठी तयारी करण्याचा अवधी हा संघर्ष पेटल्यानंतर मिळणे अवघड आहे, याची जाणीव वायुसेनाप्रमुखांनी करून दिली. दरम्यान, संरक्षणदलांचे प्रमुख सातत्याने आकस्मिकरित्या पेट घेणाऱ्या युद्धाच्या तयारीवर सर्वाधिक भर देत असल्याचे दिसत आहे. यासाठी संरक्षणदलांची क्षमता विकसित करण्यासाठी आक्रमक पावले उचलण्यात येत आहेत. युक्रेनच्या युद्धानंतर ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

नवी दिल्लीतील रायसेना डायलॉगमध्ये बोलताना युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला व्हॅन देर लियान यांनी युक्रेनच्या युद्धाचा प्रभाव इंडो-पॅसिफिक क्षेत्रावरही पडेल, असे बजावले होते. अमेरिका व युरोपिय देशांचे सारे लक्ष युक्रेनच्या युद्धाकडे लागलेले असताना, याचा फायदा घेऊन चीन तैवानवर हल्ला चढविल, असे इशारे याआधी विश्लेषकांनी दिले होते. यामुळे जपान व भारताचीही सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांनी याकडे बोट दाखविल्याचे दिसते आहे. अमेरिकेनेही चीन भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याची दाट शक्यता वर्तविली होती. तर पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी भारतात घातपात माजविला, तर दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडेल, अशी चिंता अमेरिकेकडून व्यक्त करण्यात आली होती.

भारताचा चीन किंवा पाकिस्तानशी, अथवा या दोन्ही देशांबरोबर एकाच वेळी भारताचा संघर्ष पेट घेऊ शकतो, अशी शक्यता मांडण्यात येत आहे. देशाच्या संरक्षणदलांनी एकाच वेळी ‘टू फ्रंट वॉर’ अर्थात दोन आघाड्यांवर युद्ध लढण्याची तयारी ठेवलेली आहे. पण येत्या काळात युद्ध त्वरित संपविण्याची क्षमता नसेल, तर देशाला दीर्घकालिन युद्धाचा सामना करावा लागतो, हे सिद्ध झाले आहे. सौदी अरेबिया व येमेनमधील युद्धाचा दाखला यासाठी दिला जातो.

2015 साली सुरू झालेले हे सौदी व येमेनमधील बंडखोरांचे युद्ध अजूनही संपलेले नाही. रशियासारख्या लष्करीदृष्ट्या बलाढ्य असलेल्या देशालाही दोन महिन्याहून अधिक काळ युक्रेनने युद्धात गुंतवून ठेवलेले आहे. त्यामुळे युद्ध त्वरित संपविण्याची क्षमता प्राप्त करणे अत्यावश्यक असल्याची जाणीव भारताच्या संरक्षणदलांना झालेली आहे. त्याचवेळी शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या आघाडीवर इतरांवर विसंबून राहता येणार नाही, हा धडा देखील भारताला युक्रेनच्या युद्धातून मिळाला आहे. वायुसेनाप्रमुखांनी दिलेल्या संदेशात याचे प्रतिबिंब पडल्याचे दिसते.

leave a reply