एअर इंडियाच्या मागणीमुळे जगभरात खळबळ

- एकूण ८४० प्रवासी विमाने खरेदी करण्याची तयारी

नवी दिल्ली – एअरबस व बोईंग या प्रवासी विमानांची निर्मिती करणाऱ्या जगातील अग्रगण्य कंपन्यांना मिळून ४७० विमानांची ऑर्डर देऊन एअर इंडियाने खळबळ माजविली आहे. भारताच्या प्रवासी विमानकंपनीकडून मिळालेल्या या ऑर्डरमुळे आपल्या देशांमध्ये लाखो जणांना रोजगार मिळेल, असे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. जगभरातील प्रमुख देश आर्थिक मंदीच्या गर्तेत जाण्याची शक्यता असताना, भारत जागतिक विकासाचे इंजिन म्हणून काम करणार असल्याची बाब भारतातून आलेल्या या ऑर्डरमुळे अधोरेखित झाली आहे. सारे जग यामुळे अचंबित झालेले असताना एअर इंडिया एकूण ८४० प्रवासी विमाने खरेदी करणार असल्याचे समोर आले आहे.

आपल्या निर्गुंतवणुकीच्या धोरणानुसार गेल्या वर्षी भारत सरकारने एअर इंडियामधील आपली गुंतवणूक मागे घेतली व एअर इंडिया कंपनी टाटा उद्योगसमुहाचा भाग बनली आहे. टाटा उद्योगसमुहानेच एअर इंडियाची स्थापना केली होती. पण स्वातंत्र्यानंतर एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षी एअर इंडिया टाटा उद्योगसमुहाचा भाग बनली असून या कंपनीच्या विस्तारासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले होते. भारताच्या आर्थिक प्रगतीबरोबरच विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे प्रवासी विमान कंपन्यांना फार मोठी संधी उपलब्ध होणार असून त्याचा लाभ घेण्यासाठी एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने महत्त्वाकांक्षी योजना आखलेली आहे.

यानुसार एअरबस या विमाननिर्मिती करणाऱ्या युरोपातील बलाढ्य कंपनीकडून एअर इंडिया २५० प्रवासी विमाने खरेदी करणार आहे. याचा करार झाल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून २२० विमानांच्या खरेदी व्यवहाराची माहिती एअर इंडियाने जाहीर केली. पण त्याच्याही आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी एअर इंडिया बोईंगकडून दोनशेहून अधिक विमाने खरेदी करणार असल्याची घोषणा करून त्यावर समाधान व्यक्त केले. यामुळे अमेरिकेतील दहा लाख जणांना रोजगार मिळणार असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केला होता.

एअरबस व बोईंग यांच्याकडून एअर इंडिया तब्बल ४७० विमानांची खरेदी करणार आहे, याची दखल साऱ्या जगाने घेतलेली आहे. यामुळे भारताची आर्थिक प्रगती अधिक प्रकर्षाने जगासमोर आली आहे. मात्र यावर चर्चा सुरू असतानाच, एअर इंडियाच्या ‘कमर्शिअल अँड ट्रान्स्फॉर्मेशन’ विभागाचे प्रमुख निपूण अग्रवाल यांनी एअर इंडियाने एकूण ८४० प्रवासी विमानांची मागणी नोंदविलेली आहे, असा दावा केला. यातील ४७० विमाने एअरबस व बोईंगकडून येतील. पण उरलेल्या ३७० विमानांसाठी एअर इंडियासमोर पर्याय खुले असतील, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.

leave a reply