येमेनमधील अमेरिकेच्या हल्ल्यात अल कायदाच्या कमांडरचा खातमा

अल कायदादुबई – येमेनच्या मारिब प्रांतात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात ‘अल कायदा इन अरेबियन पेनिन्सूला’चा वरिष्ठ कमांडर ठार झाला. येमेनमधील अल कायदाच्या नेटवर्कसाठी हा मोठा धक्का असल्याचा दावा अमेरिका करीत आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेने याच प्रांतात केलेल्या कारवाईत अल कायदाचे तीन दहशतवादी ठार केले होते.

येमेनमधील अल कायदा ही जागतिक सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. २०१५ साली येमेनमध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धाचा फायदा घेऊन अल कायदाने या देशात आपले पाय रोवले आहेत. या दहशतवादी संघटनेचा येमेनमधील वाढता प्रभाव आखाती देशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो, असा इशारा अमेरिकेने दिला होता. या पार्श्वभूमीवर, येमेनमधील अल कायदाच्या ठिकाणांवर अमेरिकेचे ड्रोन हल्ले सुरू असतात.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने येमेनच्या मारिब प्रांतात केलेल्या ड्रोन कारवाईत ‘हमाद बिन हमौद अल-तमिमी’ उर्फ अब्देल अझिझ अल-अदनानी याला ठार केल्याचे अमेरिकेने जाहीर केले. तमिमीसोबत त्याचा अंगरक्षक देखील ठार झाला. मारिबमधील एका इमारतीत तमिमीने एक घर भाड्याने घेतले होते. यावरच अमेरिकेने ड्रोन हल्ला चढविला.

leave a reply