अल कायदा अमेरिकेवर भीषण हल्ले चढविण्याच्या तयारीत

अमेरिकी माध्यमांचा दावा

9-11 terror attackवॉशिंग्टन – 9/11चा हल्ला घडवून अमेरिकेसह साऱ्या जगाला हादरविणाऱ्या अल कायदाने, दोन दशकानंतर अशाच तीव्रतेचे हल्ले अमेरिकेवर चढविण्याची तयारी केली आहे. या हल्ल्यांसाठी विमानांचा वापर करण्यापासून ते अमेरिकेच्या लष्करी तळांवर ‘लोन वुल्फ’चे हल्ले घडविण्याचा कट अल कायदाने आखला आहे. आपल्या नियतकालिकाच्या माध्यमातून अल कायदाने आपल्या हस्तकांना याचा संदेश दिल्याचा दावा अमेरिकन माध्यमांनी केला आहे. अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाकडे याची माहिती असल्याचे या माध्यमांचे म्हणणे आहे.

United_States_Department11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर, न्यूयॉर्क तसेच संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉन येथे भीषण दहशतवादी हल्ले झाले. अल कायदाच्या दहशतवाद्यांनी विमानांचे अपहरण करून वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेल्या हल्ल्यांनी सारे जग हादरले होते. यामध्ये तीन हजारांहून अधिक जणांचा बळी गेला होता. यानंतर अमेरिकेने दहशतवादविरोधी युद्ध पुकारुन अफगाणिस्तान व इराकवर हल्ले चढविले होते. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला ठार करून अमेरिकेने दहशतवादविरोधी युद्ध जिंकल्याचे जाहीर केले.

पण अल कायदा अजूनही जिवंत असून ही संघटना तितकीच विध्वंसक कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. सारे जग नववर्षाच्या स्वागताच्या तयारीत असताना काही सोशल मीडियावरील अल कायदाच्या चॅनेल्सवर नव्या हल्ल्यांबाबत चर्चा सुरू होती. ‘जुमादाब अल-अवाल’ या नियतकालिकामध्ये अल कायदाने या हल्ल्यांची माहिती उघड केली आहे. अमेरिकेवर मोठ्या संख्येने हल्ले चढविण्याची तयारी सुरू असल्याचे यात म्हटले आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुन्हा विमानांचे हल्ले किंवा आत्मघाती हल्लेखोराद्वारे हे हल्ले चढविले जातील, असा इशारा यात देण्यात आला आहे.

us plane‘अल कायदाचे सामर्थ्य सर्वदूर पसरलेले आहे, याची अमेरिकेला येत्या काळात साक्ष पटेल. अल कायदाचे हात कुणीही बांधू शकत नाही’, अशी धमकी या नियतकालिकेतून अल कायदाने दिली आहे. त्याचबरोबर 2009 साली फोर्ट हूड आणि 2019 साली पेन्साकोला येथील नौदलाच्या हवाईतळावर झालेल्या हल्ल्यांचा उल्लेखही यात करण्यात आला आहे. या हल्ल्यांमध्ये अमेरिकी लष्कराच्या जवानांबरोबर ‘सीआयए’ या गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी देखील मारले गेले होते, याची आठवण करून देत अल कायदाने सदर हल्ल्यांची पुनरावृत्ती करण्याची चिथावणी दिली.

अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या (डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी) सूत्रांनी अल कायदाच्या या तयारीची माहिती दिल्याचे अमेरिकन माध्यमांचे म्हणणे आहे. पण अमेरिकेतील आघाडीच्या माध्यमांमध्ये याविषयीची बातमी प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अमेरिकेवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने याआधी दिला होता. आयएसचे दहशतवादी अमेरिकेवर हल्ले चढवू शकतात, असे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे होते. पण अल कायदाने नियतकालिकातून आपल्या हस्तकांना अमेरिकेवर हल्ले चढविण्याचा दिलेला संदेश अतिशय गंभीर बाब ठरते. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने वाढत असताना, अल कायदाकडून नव्या 9/11च्या हल्ल्याची तयारी ही जगासाठी अतिशय गंभीर बाब ठरते.

leave a reply