मोगादिशू, दि. ३१(वृत्तसंस्था)- सोमाली नॅशनल आर्मीने (एसएनए) दक्षिण-पश्चिम प्रांताच्या शाबेली प्रांतामध्ये केलेल्या लष्करी कारवाईत अल-शबाबचे १४२ दहशतवादी ठार झाले. सोमालियन लष्कराच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. गेल्या काही दिवसात सोमालियन लष्कराने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
मोगादिशुपासून ९५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जनालेवर अल-शबाबचा ताबा आहे. अल कायदाशी संलग्न संघटना असलेल्या अल-शबाबने सोमालियाच्या कृषी क्षेत्रातील या महत्त्वाच्या भागावर बराच काळ आपले वर्चस्व ठेवण्यात यश मिळवले होते. १८ मार्च रोजी सोमालियन लष्कराने जनालेमध्ये घुसून अल शबाबच्या विरोधात आक्रमक मोहीम छेडली व जनाले शहरात प्रवेश केला. यानंतर सोमालियन जवान आणि अल शबाबच्या दहशतवाद्यांमध्ये घनघोर संघर्ष सुरू झाला. रविवारी २९ मार्च रोजी हा संघर्ष संपल्याचे सोमालियन लष्कराने जाहीर केले. या कारवाईत १४२ दहशतवादी ठार झाले असून २८ दहशतवादी जखमी झाले आहेत. शिवाय १८ दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात सोमालियन लष्कराला यश मिळाले आहे.
या कारवाईमुळे जनाले व या भागाच्याजवळील अनेक गावे अल-शबाबच्या तावडीतून सुटली आहेत. तसेच या कारवाईत सोमालीयन लष्कराची कुठलीही हानी झाली नसल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.