अमेरिकन जनतेला अणुयुद्धाची चिंता करण्याची गरज नाही

- राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा संदेश

वॉशिंग्टन – युक्रेनला अमेरिका व नाटोने लष्करी सहाय्य पुरविण्याची भाषा सुरू केल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी या संघर्षाचे अणुयुद्धात पर्यावसन होईल, असे संकेत दिले होते. रशियन राष्ट्राध्यक्षांनी न्यूक्लिअर फोर्सेस सज्ज ठेवल्याच्या बातम्याही आल्या होत्या. इतकेच नाही तर रशियन लष्कर, नौदल व हवाईदलातील अण्वस्त्रे अर्थात न्यूक्लिअर ट्रायड तयारीत असल्याची माहिती रशियन संरक्षणमंत्र्यांनी दिली होती. असे असले तरी अमेरिकन जनतेने अणुयुद्धाची चिंता करू नये, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी माध्यमांशी बोलताना अमेरिकन जनतेला आश्‍वास्त करण्याचा प्रयत्न केला. युक्रेनचा संघर्ष चिघळला तर त्यामुळे अणुयुद्धाचा भडका उडेल, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन बजावत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेने अणुयुद्धाची चिंता करावी का? असा प्रश्‍न अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विचारण्यात आला होता. ‘नो’ असे उत्तर देऊन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी हा मुद्दा निकालात काढला. पुढे व्हाईट हाऊसच्या माध्यमसचिव जेन साकी यांनी अमेरिकेचे आण्विक धोरण बदलण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे सांगून यावर सारवासारव केली.

रशियन राष्ट्राध्यक्षांनी अणुयुद्धावरून दिलेल्या इशार्‍याचा दाखला देऊन अशारितीने चुकीचे आडाखे बांधण्याचा घातक डाव अमेरिका खेळणार नसल्याचे साकी यांनी म्हटले आहे. अमेरिका किंवा नाटोला रशियाबरोबर संघर्ष सुरू करण्यात स्वारस्य नाही, हे देखील जेन साकी यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. एकीकडे पोलंडमध्ये अमेरिका व नाटोच्या तैनातीमुळे आपल्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा इशारा बेलारूस देत आहे. अमेरिका-नाटोच्या अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर देण्यासाठी बेलारूस रशियाची अण्वस्त्रे आपल्या देशात तैनात करील, असे बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले होते.

युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना, शेजारी देश असलेल्या बेलारूसने दिलेला हा इशारा लक्षवेधी ठरतो. रशियाने देखील आपल्या शेजारी देशांमध्ये अमेरिक व नाटोची अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे खपवून घेणार नाही, असे याआधीच स्पष्ट केले होते. युक्रेनवर हल्ला चढविण्यामागे हेच प्रमुख कारण असल्याचे रशिया सातत्याने सांगत आहे. यामुळे अणुयुद्धाचा धोका बळावल्याची चिंता विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. मात्र अमेरिकेला त्याची चिंता करण्याची गरजच नाही, असे संकेत देऊन राष्ट्राध्यक्ष बायडेन व त्यांच्या सहकार्‍यांनी हा मुद्दा निकालात काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

मात्र अमेरिकेने रशियाच्या शेजारी देशांमध्ये आण्विक तैनाती केली, तर रशिया देखील त्याच भाषेत त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी करीत आहे. क्युबा, निकारागुआ आणि व्हेनेझुएला या देशांशी सहकार्य करून रशिया इथे आपली अण्वस्त्रे तैनात करू शकेल. या देशांशी रशियाने चर्चाही सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र ही शक्यता मांडून अमेरिकेचे प्रशासन युक्रेनबाबत स्वीकारलेल्या आपल्या धोरणाचे परिणाम जनतेपर्यंत पोहोचू नये, यासाठी धडपडत आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सदर प्रश्‍नाला दिलेले ‘नो’ हे उत्तर ही बाब अधोरेखित करत आहे.

leave a reply