ब्रिक्स देशांमध्ये भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने पूर्वपदावर येत आहे

- ब्रिक्स इकॅानॉमिक बुलेटिनचा दावा

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटाचा विघातक परिणाम चीन, रशिया, भारत, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल या ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्थांवर झाला आहे. यातून ब्रिक्स देश आता बाहेर पडत आहेत. या ब्रिक्स देशांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने पूर्वपदावर येत असल्याचा दावा ब्रिक्स इकॉनॉमिक बुलेटिनमध्ये करण्यात आला आहे.

ब्रिक्स देशांमध्ये भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने पूर्वपदावर येत आहे - ब्रिक्स इकॅानॉमिक बुलेटिनचा दावाब्रिक्स कॉंटिन्जट रिझर्व्ह अरेंजमेंट (सीआरआय) रिसर्च ग्रुपने हा अहवाल तयार केला आहे. कोरोनाच्या संकटाने ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्थांवर मोठा आघात केला आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्व ब्रिक्स देशांनी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी उपायोजना हाती घेतल्या. ब्राझिल, भारत आणि दक्षिण आफ्रिकेने मोठ्या प्रमाणावर पावले उचलली, याचा उल्लेख ब्रिक्स इकॉनॉमिक बुलेटनने केला आहे. मात्र अजूनही ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्था या साथीच्या धक्क्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकलेल्या नाहीत. या अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असताना दक्षिण आफ्रिका आणि रशियाला तिसर्‍या लाटेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थांसमोर नवा धोका खडा ठाकला आहे. ही बाब या बुलेटिनमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. तसेच चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे चीनमध्ये अनेक ठिकाणी निर्बंध टाकावे लागत असल्याचे या बुलेटिनमध्ये स्पष्ट करण्यात आले.

भारतात दुसर्‍या लाटेत पुन्हा टाकाव्या लागलेल्या निर्बंधांमुळे भारताच्या आर्थिक प्रगतीला खीळ बसली होती. पण भारतीय अर्थव्यवस्था हळुहळू पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दक्षिण आफ्रिका, रशिया, चीनमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण वाढत असताना भारतात कोरोनाचा संक्रमण कमी झालेले आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेने गती घेतली असून ब्रिक्स देशांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने पूर्वपदावर येत असल्याची नोंद या बुलेटिनमध्ये करण्यात आली आहे.

leave a reply