अमरुल्लाह सालेह यांच्या नेतृत्वाखाली ‘नॉर्दन अलायन्स’चे तालिबानवर हल्ले सुरू

बझारक – अश्रफ गनी यांनी पलायन केल्यानंतर आपणच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असल्याची घोषणा करणाऱ्या अमरुल्ला सालेह यांनी तालिबानच्या दहशतवाद्यांच्या ताब्यातून चरीकर भाग परत मिळविला. दोन दशकांपूर्वी अफगाणिस्तानात तालिबानच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या ‘नॉर्दन अलायन्स’बरोबर सालेह यांनी आघाडी केली आहे. तालिबानविरोधी गट सालेह यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत आहेत. ताजिकिस्तानने देखील सालेह हेच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असल्याचे म्हटले आहे.

अमरुल्लाह सालेह यांच्या नेतृत्वाखाली ‘नॉर्दन अलायन्स’चे तालिबानवर हल्ले सुरूअफगाणिस्तानच्या परवान प्रांतातील चरीकर भागावर तालिबानच्या दहशतवाद्यांनी ताबा घेतला होता. पण सालेह यांच्या नेतृत्वाखाली जमा झालेल्या टोळ्यांनी चरीकरचे नियंत्रण मिळवून तालिबानच्या दहशतवाद्यांना पिटाळून लावले. यानंतर या टोळ्यांनी ‘नॉर्दन अलायन्स’चा ध्वज चरीकर भागात फडकवला. पंजशीर प्रांतातील रस्त्यांवर ठिकठिकाणी ‘नॉर्दन अलायन्स’चे ध्वज फडकत असल्याचे फोटोग्राफ्स व व्हिडिओज्‌ समोर येत आहेत. तर पंजशीरचा ताबा घेण्यासाठी तालिबानच्या दहशतवाद्यांनी काही ठिकाणी हल्ले सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत.

सालेह यांनी तालिबानच्या विरोधात पुकारलेल्या या संघर्षामुळे ‘नॉर्दन अलायन्स’ पुन्हा मजबूत होत असल्याचे बोलले जाते. अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुखपद व उपराष्ट्राध्यक्षपद स्वीकारण्याआधी सालेह हे नॉर्दन अलायन्सचे सदस्य होते. नॉर्दन अलायन्सचे प्रमुख अहमद शाह मसूद हे सालेह यांचे आदर्श होते. अहमद शाह मसूद यांच्यानंतर पंजशीर प्रांताचे नेतृत्व त्यांचा मुलगा अहमद मसूद याच्याकडे असून सालेह यांचे मित्र मानले जातात.

leave a reply