चीनवर नजर ठेवून भारताशी सहकार्य वाढविण्याकरीता अमेरिकन नौदलाच्या नव्या ‘फ्लीट’ची घोषणा

चीनवर नजरवॉशिंग्टन – चीनच्या घातक हालचालींवर नजर ठेवून या देशाला रोखण्यासाठी केवळ भारताबरोबरील सहकार्यावर लक्ष केंद्रीत करणारे नौदल पथक अमेरिका विकसित करीत आहे. अमेरिकेचे ‘नेव्हल सेक्रेटरी केनेथ ब्रेथवेट’ यांनी ही घोषणा केली. भारताच्या भेटीवर येण्याच्या आधी ब्रेथवेट यांनी केलेल्या या घोषणेला फार मोठे सामरिक महत्त्व आले आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेचे सहकार्य अधिकच भक्कम होणार असून चीनच्या महत्त्वाकांक्षेला वेसण घालण्याचे काम दोन्ही देशांसाठी अधिक सोपे होऊ शकेल.

पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या हालचालीवर नजर ठेवण्याची जबाबदारी जपानमध्ये तैनात असलेल्या अमेरिकन नौदलाच्या ‘सेव्हन्थ फ्लीट’वर आहे. पण पुढच्या काळात यासाठी अमेरिकन नौदलाला केवळ सेव्हन्थ फ्लीटवर अवलंबून राहता येणार नाही, असे संकेत देऊन अमेरिकेचे ‘नेव्हल सेक्रेटरी केनेथ ब्रेथवेट’ यांनी नव्या फ्लीटची घोषणा केली. याबरोबरच अमेरिकन नौदलाला भारत आणि सिंगापूर यांच्यासारख्या मित्रदेशांबरोबरील सहकार्य अधिक व्यापक करावे लागेल, असे ब्रेथवेट पुढे म्हणाले.

चीनवर नजर

भारत तसेच सिंगापूर सारख्या सहकारी देशांबरोबरील अमेरिकन नौदलाचे सामरिक सहकार्य या क्षेत्रात आवश्यक तो समतोल साधेल अशा नेमक्या शब्दात ब्रेथवेट यांनी अमेरिकेची भूमिका मांडली. चीनच्या आक्रमकतेमुळे ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील समतोल ढासळल्याचा आरोप अमेरिकेकडून सातत्याने करण्यात येतो. त्या पार्श्‍वभूमीवर, भारत व अमेरिकेमधील सामरिक सहकार्य इंडो-पॅसिफिकमधील सत्तेचा समतोल व स्थैर्य कायम राखणारी शक्ती बनेल, असा विश्‍वासही अमेरिकेकडून सातत्याने व्यक्त करण्यात येत आहे. ब्रेथवेट यांनीही ही भूमिका मांडली असून यासाठी आपण आपल्या आगामी भारतभेटीकडे मोठ्या विश्‍वासाने पाहत असल्याचे ब्रेथवेट यांनी म्हटले आहे.

चीनच्या वर्चस्ववादाचा मुकाबला करण्यासाठी एकटी अमेरिका पुरेशी ठरणार नाही. त्यासाठी अमेरिकेला विश्‍वासार्ह मित्रदेशांचे सहकार्य लागेल. यासाठी अमेरिका प्रयत्नशील असल्याचे सूचक विधान ब्रेथवेट यांनी केले आहे. आपल्या भारतभेटीत दोन्ही देशांसमोरील सुरक्षाविषयक आव्हानांवर सखोल चर्चा होईल, तसेच उभय देशांचे नौदल परस्परांना कशारितीने सहकार्य करू शकतील, यावरही महत्त्वपूर्ण चर्चा होईल, असे ब्रेथवेट यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सिंगापूरमधील नौदल तळ विकसित करून अमेरिकन नौदलाच्या नव्या फ्लीटचे केंद्र या ठिकाणी उभारण्याची तयारी अमेरिकेने केल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे भारतीय नौदलाबरोबरील सहकार्य वाढविण्याला सर्वाधिक प्राधान्य अमेरिकन नौदलाच्या या फ्लीटकडून देण्यात येणार असून ही भारतासाठीही अत्यंत महत्त्वाची बाब ठरणार आहे.

leave a reply