दिवाळीनंतर देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली

नवी दिल्ली – दिवाळीनंतर देशातील कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. देशात मंगळवारी ३८ हजार ६१७ नव्या रुग्णांची नोंद झाली. याआधी सोमवारी २९ हजार १६४ नवे रुग्ण आढळले होते. गेल्या काही दिवसांपासून देशात दरदिवशी आढळणार्‍या नव्या रुग्णांचा आलेख कमी होत होता. सलग ११ दिवसांपासून एका दिवसात ५० हजारापेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे. मात्र सोमवारच्या तुलनेत मंगळवारी अचानक नव्या रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे. दिल्लीतच सोमवारच्या तुलनेत मंगळवारी ७५ टक्के अधिक नवे रुग्ण आढळले. सणासुदीच्या काळात बेजबाबदारपणा दाखवल्यास कोरोनाचे आकडे उलटे फिरू शकतात, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ही वाढ चिंताजनक ठरत आहे.

३० टक्क्यांनी

देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८९ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. मंगळवारी देशात ४७४ जणांचा या साथीने मृत्यू झाला होता. यामुळे देशातील कोरोनाच्या बळींची संख्या १,३१०००च्या पुढे गेली आहे. तसेच देशात ८३ लाख ३५ हजार रुग्ण आतापर्यंत या साथीच्या आजारातून बरे झाले आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून देशात आढळणार्‍या नव्या रुग्णांपेक्षा दर दिवशी बरे होणार्‍या रुग्णांची संख्या अधिक नोंदवली जात आहे. मंगळवारी एका दिवसात ४४,७३९ रुग्ण बरे झाले. त्यामुळे देशातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९३.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.

दिल्लीत ६३९६ नव्या रुग्णांची नोंद झाली. सोमवारी दिल्लीत ३७९७ नवे रुग्ण आढळले होते. केरळात ५७९२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तसेच पश्चिम बंगालमध्ये ३६५४ नवे रुग्ण सापडले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली. देशात एका दिवसात झालेल्या मृत्यूंपैकी ७८ टक्के मृत्यू केवळ १० राज्यात झाले आहेत. यामध्ये दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे.

दरम्यान, दिवाळीत बाजारपेठांमध्ये गर्दीमुळे, प्रदूषण आणि पारा घसरल्याने कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागतील, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात येत आहेत. दिवाळीनंतरचे दोन ते तीन आठवडे चिंताजनक ठरू शकतील. या काळात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा धोका आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही शहरांमध्ये तशी परिस्थिती दिसून येत आहे. दिल्लीत कोरोनाच्या नव्या लाटेने परिस्थिती जून आणि जुलैपेक्षा खराब झाली आहे. दिल्लीत लॉकडाऊन करण्यात येणार नसले, तरी कॉंटेन्मेन्ट झोन वाढविण्यात आले आहेत. तसेच आयसीयू बेडची संख्या वाढविण्यात आली आहे.

leave a reply