आणखी ४७ चिनी अ‍ॅप्सवर बंदी

२७५ अ‍ॅप्सवर लवकरच कारवाईची शक्यता

नवी दिल्ली – आणखी ४७ चिनी अ‍ॅप्सवर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी टाकून भारताने चीनला पुन्हा एक दणका दिला आहे. याशिवाय २७५ चिनी अ‍ॅप्सवर सरकारकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून या अ‍ॅप्सवर लवकरच कारवाई होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जाते.

गलवान व्हॅली संघर्षांनंतर भारताकडून चीनला एकामागोमाग एक आर्थिक दणके दिले जात आहेत. याचे परिणाम दिसू लागले आहेत. चीनमधून येणारी परकीय गुंतवणूक (एफडीआय) रोखण्यासाठी नियमात बदल करण्यात आल्याने चिनी कंपन्यांद्वारे आलेले सुमारे २०० गुंतवणूक प्रस्ताव गृहमंत्रालयाच्या मंजुरी अभावी राखडल्याची बातमी आहे.

Chinese-apps-banयाशिवाय सरकारी खरेदीची कंत्राटे चिनी कंपन्यांना मिळू नयेत यासाठी निविदा नियमात बदल करण्यात आले होते. हुवेई, झेडटीई सारख्या कंपनीला टेलिकॉम कंपन्यांनी कंत्राटे देऊ नये असे आदेश आहेत. तसेच या कंपन्यांना ५जी सेवेपासूनच्या प्रक्रियेपासून बाहेर ठेवण्यात आले आहे. यामुळे हुवेईने भारतीय बाजारपेठ गमावल्याचे दिसून येत आहे. यामुळे हुवेईने भारतातील ६० टक्के कर्मचारी कमी करत असून भारतातून उत्पन्नाचे लक्षही या कंपनीने ५० टक्क्यांनी घटविल्याचे वृत्त आहे.

चीन सीमेवर तणाव पूर्ण निवळत नाही, चीन ठरल्याप्रमाणे लडाखमधून आपले सैनिक मागे घेत नाही तोपर्यंत चीनबरोबर व्यापार होणार नाही. अशी स्पष्ट भूमिका रशियातील भारताच्या राजदूतांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर आणखी ४७ चिनी अ‍ॅप्सवर सरकारने बंदी टाकल्याची बातमी येत आहे. याआधी गेल्या महिन्यात सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवरबंदी टाकली होती. यामुळे या अ‍ॅप्सशी संबंधित कंपन्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. या अ‍ॅप्सशी संबंधित कंपन्यांच्या जागतिक विस्ताराच्या महत्वाकांक्षेला धक्का लागले आहेत. टिकटॉक चालविणाऱ्या कंपनीने भारतातील आपला व्यवसाय गुंडाळायला सुरुवात केल्याच्या बातम्या आल्या होत्या.

सोमवारी सरकारने बंदी टाकलेल्या चिनी अ‍ॅप्समध्ये याआधी बंदी टाकलेल्या अ‍ॅप्सच्या क्लोन आवृत्या आहेत. यामध्ये टिक टॉक लाईट, शेअरइट लाईट, बिग लाईट, एफवाय लाईट, वीगो लाईट यासारख्या अ‍ॅप्चा समावेश आहे. याआधीच गुगल प्ले आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप्स स्टोअरवरून हे अ‍ॅप्स हटविण्याचे निर्देश सरकारने दिले होते.

याशिवाय सरकार २७५ चिनी अ‍ॅप्सवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. या अ‍ॅप्सचा सतत आढावा घेतला जात आहे. यामध्ये चिनी कंपनी टेन्सेन्टकडून चालविल्या जाणाऱ्या ‘पबाजी’ अ‍ॅप्सबरोबर जिली, कॅपक, एलबीई टेक, परफेक्ट कॉर्प, सीना कॉर्प, नेटीज गेम्स, अलीएक्सप्रेस, रेसो, यूलाइक सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. यातील दोन अ‍ॅप्सचा समावेश अलीबाबा कंपनीशी आहे.

leave a reply