कोरोनाच्या साथीवरून आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये सुरू असलेल्या भारताच्या विरोधातील एकांगी, नकारात्मक प्रचाराला उत्तर द्या

- भारतीय राजदूतांना परराष्ट्रमंत्र्यांचा संदेश

नवी दिल्ली – भारतात कोरोनाचा फैलाव वाढत असताना, आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये याचे एकतर्फी व नकारात्मक चित्रण केले जात आहे. भारत सरकार ही साथ रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा समज आंतरराष्ट्रीय माध्यमे करून देत आहेत. भारताच्या विरोधातील या नकारात्मक प्रचाराला प्रत्युत्तर द्या आणि त्याचा प्रतिवाद करा, असा संदेश परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जगभरातील देशांमध्ये कार्यरत असलेल्या भारताच्या राजदूतांना दिला. गेल्या काही दिवसांपासून पाश्‍चिमात्य माध्यमे कोरोनाच्या फैलावावरून भारताला लक्ष्य करीत असून त्याचे अतिरंजित वार्तांकन करीत आहेत. यामागे भारताची प्रतिमा डागाळण्याचा जाणीवपूर्वक कट असल्याचा आरोप सोशल मीडियावर काहीजणांकडून केला जात आहे.

आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये विशेष स्थान असलेल्या अग्रगण्य वर्तमानपत्रांकडून तसेच आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारताचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दावे केले जात आहेत. याचे शक्य तितके अतिरंजित चित्रण केले जात असून भारताची व्यवस्थाच कोलमडल्याचे दावे या माध्यमांकडून केले जात आहेत. याचा भारताच्या प्रतिमेवर परिणाम होऊ लागला असून त्याची गंभीर दखल परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली. जगभरातील भारताच्या राजदूतांना याची जाणीव करून देण्यात आली असून या भारतविरोधी प्रचाराचा प्रतिवाद करण्याचा सल्ला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिला.

कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना, भारतात ऑक्सिजनची टंचाई आहे. याची पूर्वतयारी भारताने केली नव्हती, असे पाश्‍चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे. तसेच कोरोनाची साथ असताना, पश्‍चिम बंगाल, केरळ या राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या, यावरही पाश्‍चिमात्य माध्यमे टीका करीत आहेत. मात्र महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही कोरोनाचा सर्वाधिक प्रमाणात फैलाव झालेली राज्ये आहेत. या राज्यात काही निवडणुका नव्हत्या, याकडे पाश्‍चिमात्य माध्यमे लक्ष द्यायला तयार नाहीत. याकडे परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले. तसेच भारतात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. पण त्याची हॉस्पिटल्सपर्यंत वाहतूक करणे ही समस्या बनली आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले.

आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये कोरोनाच्या फैलावाचे तपशील आवश्यक प्रमाणात दिले जात नाहीत. केवळ भारतच नाही तर इतर विकसनशील देशांच्या बाबतीतही पाश्‍चिमात्य माध्यमे अशा स्वरुपाची एकांगी भूमिका स्वीकारत असल्याचे याआधी अनेकवार उघड झाले होते. विशेषतः भारताच्या सोशल मीडियावर काहीजणांनी ही बाब ठळकपणे लक्षात आणून दिली. अमेरिका व युरोपिय देशांमध्ये कोरोनाची पहिली लाट धुमाकूळ घालत होती, त्या काळात भारताने कोरोनाचा समर्थपणे मुकाबला केला होता. अमेरिका व युरोपमधील विकसित देशांच्या आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्या होत्या, त्या काळात भारताच्या आरोग्य यंत्रणेने या साथीवर नियंत्रण मिळविले होते. त्या काळात भारताच्या आरोग्य यंत्रणेच्या जबरदस्त कामगिरीची दखल पाश्‍चिमात्य माध्यमांनी घेतली नव्हती. कोरोनाप्रतिबंधक लसीच्या निर्मितीच्या आघाडीवर भारताने विकसित देशांनाही मागे टाकले होते, ही बाब पचविणे पाश्‍चिमात्य माध्यमांना जड गेले होते.

अमेरिकेत आत्तापर्यंत सापडलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीन कोटी, २८ लाख इतकी आहे. या साथीने अमेरिकेत तब्बल पाच लाख, ८६ हजार जणांचा बळी घेतला. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात युरोपिय देशांमध्ये कोरोनाच्या साथीचे चार कोटी, ५९ लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या साथीने युरोपमधील दहा लाख जणांचा बळी घेतला. अशा परिस्थितीत भारतातील कोरोनाच्या फैलावाचे विपर्यास्त आणि अवास्तव वार्तांकन पाश्‍चिमात्य माध्यमांच्या पूर्वग्रहदूषित मानसिकतेचा परिचय देत आहे. तसेच यामागे निराळे हेतू असल्याची बाबही समोर येत आहे.

१५ एप्रिलनंतर भारतात एकाएकी कोरोनाचा फैलाव प्रचंड प्रमाणात वाढला आणि त्याचा जबरदस्त ताण आरोग्य यंत्रणांवर आला, हे नाकारता येणार नाही. ऑक्सिजनचा व काही औषधांचा तुटवडा यामुळे हे संकट अधिकच तीव्र बनले. मात्र भारताची यंत्रणा सार्‍या शक्तीनिशी या आव्हानाचा मुकाबला करीत आहे, हे पाश्‍चिमात्य माध्यमे सांगायला तयार नाहीत. कोरोनाच्या लसींची मोठ्या प्रमाणात निर्मिती करून तसेच लस येण्यापूर्वी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सारखे औषध जगाला पुरविल्याने भारताची प्रतिमा विकसित देशांपेक्षाही अधिक प्रमाणात उजळली होती. मात्र भारतच संकटात सापडलेला आहे, असे दाखवून पाश्‍चिमात्य माध्यमे भारताच्या विरोधात अपप्रचाराची मोहीम राबवित आहेत.

पण फार काळ या माध्यमांना असा अपप्रचार करण्याची संधी मिळणार नाही. देश लवकरच या साथीवर नियंत्रण मिळविल, असा विश्‍वास सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी भारताचे सरकार, आरोग्य यंत्रणा व उद्योगक्षेत्र अथकपणे कार्यरत आहे, याचे दाखलेही दिले जात आहेत.

leave a reply