सुदानमध्ये लष्करी बंडाविरोधातील आंदोलन चिघळले

- आठ ठार, २००हून अधिक जखमी

आंदोलनखार्तुम – सुदानमध्ये लष्करी बंडाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनावर लष्कराने केलेल्या कारवाईत आठ जणांचा बळी गेला आहे. यात एका १३ वर्षाच्या मुलीचा समावेश असून लष्कर निदर्शकांना टिपून गोळ्या झाडत असल्याचा आरोप लोकशाहीवादी गटांनी केला. या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर सुदानच्या लष्कराने संमिश्र अर्थात लष्कर व राजकीय पक्षांचा सहभाग असलेल्या सरकारचा प्रस्ताव पुढे केला आहे.

गेल्या महिन्यात सुदानच्या लष्कराने बंड करून सत्ता हाती घेतली होती. सुदानमध्ये गेल्या दोन वर्षात सत्ताधारी राजवट उलथण्याची ही दुसरी वेळ आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बंडात लष्कराचे प्रमुख जनरल अब्देल फताह बुर्‍हान यांनी पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्र्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आणीबाणी घोषित करुन राजकीय हस्तांतरणाची प्रक्रिया पुढे नेण्याचे आश्‍वासन दिले होते.

आंदोलनमात्र या आश्‍वासनाची पूर्तता न झाल्याने लोकशाहीवादी गटांनी आंदोलन अधिक तीव्र केले आहे. राजधानी खार्तुमसह जवळच्या शहरांमध्ये व्यापक निदर्शने सुरू असून त्याला हिंसक वळण लागल्याचे समोर आले. निदर्शनांमधील हिंसाचार रोखण्यासाठी लष्कराने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत आठजणांचा बळी गेला असून २०० हून अधिक जखमी आहेत. हे बळी लष्कराने केलेल्या गोळीबारात गेल्याचा दावा आंदोलकांनी केला. पण लष्कराने आपण रबर बुलेट्स व अश्रुधुराचा वापर केल्याचे सांगून जबाबदारी नाकारली आहे.

दोन वर्षांपूर्वी सुदानचे तत्कालिन हुकुमशहा ओमर अल बशिर यांची सत्ता उलथविण्यात आली होती. त्यानंतर सुदानची सूत्रे लष्कर व राजकीय गटांचा समावेश असलेल्या संयुक्त हंगामी सरकारच्या ताब्यात देण्यात आली होती. मात्र बंडानंतर ही सूत्रे पूर्णपणे लष्कराच्या ताब्यात गेली आहेत. यामुळे पाश्‍चात्य देशांसह आफ्रिकी देशही नाराज असून सुदानविरोधात आक्रमक पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.

leave a reply