रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या इशाऱ्यानंतरही इराणमध्ये राजवटविरोधी निदर्शने सुरूच

हिजाबविरोधात भूमिका घेणाऱ्या सेलिब्रिटी शेफचा कारागृहात मृत्यू

iran protest 3तेहरान – गेल्या सहा आठवड्यांपासून इराणमध्ये भडकलेली राजवटविरोधी निदर्शने त्वरीत थांबवा, अशी धमकी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या प्रमुखांनी दिली होती. यानंतर हिजाबसक्तीच्या विरोधात सुरू असलेली ही निदर्शने शांत होतील, असा दावा इराणी माध्यमांनी केला होता. पण हिजाबविरोधी आंदोलनाचा समर्थक मेहरशाद शाहिदी या तरुण सेलिब्रिटी शेफचा इराणी सुरक्षा यंत्रणेच्या कैदेत संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर निदर्शनांचा नव्याने भडका उडाला आहे. ‘हुकूमशहाचा अंत होवो’, अशा घोषणांचा जोर वाढत असून राजधानी तेहरानमधील पत्रकारांच्या गटाने देखील इराणच्या राजवटीच्या कारवाईवर टीका करणारे लेख प्रसिद्ध केले आहेत.

iran protest 4इराणच्या राजवटीने लागू केलेल्या हिजाबसक्तीच्या विरोधात आंदोलन छेडणाऱ्या माहसा अमिनी या कुर्द तरुणीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सुरू झालेल्या निदर्शनांची धार अधिकच वाढली आहे. अमेरिका, इस्रायल आणि सौदी अरेबियाने ही निदर्शने भडकवल्याचा आरोप इराणने केला होता. इराणच्या जवळपास १२५ शहरांमध्ये निदर्शने झाली असून यात किमान ३०० जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. तर या निदर्शकांवर केलेल्या कारवाईत इराणच्या यंत्रणेने १४ हजारांहून अधिक जणांना अटक केली आहे.

या निदर्शनांना विद्यार्थी, तरुण-तरुणी, शिक्षक, इंधन प्रकल्पांवरील कामगार, खेळाडू, उद्योजक, चित्रपट निर्माते, सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्लॉगर्स यांचे समर्थन मिळत आहे. तरी देखील इराणचे सरकार आणि रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स या निदर्शनांसाठी परकीय शक्ती जबाबदार असल्याचा आरोप करीत आहे. त्याचबरोबर इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांना लक्ष्य करणारी ही निदर्शने थांबविण्यासाठी निदर्शकांना धमकावत आहे. दोन दिवसांपूर्वी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या प्रमुखांनी निदर्शकांना अशीच धमकी दिली होती.

पण यानंतरही हिजाबसक्तीला विरोध करणारे गट राजधानी तेहरानपासून वेगवेगळ्या शहरांमधील रस्त्यावर उतरून निदर्शने करीत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. इराणच्या वायव्येकडील सानांदाज या कुर्द शहरातील महिलांनी हिजाब हवेत उडवून आणि राजवटीच्या विरोधात घोषणा दिल्याच्या बातम्या येत आहेत. तर राजधानी तेहरानमध्ये ‘हुकूमशहाचा अंत होवो’, अशा घोषणा देणाऱ्या निदर्शकांवर इराणच्या सुरक्षा यंत्रणेने स्टन ग्रिनेडचा वापर केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

IRAN-PROTEST-WOMEN-MEDIAतेहरानमधील विद्यापीठात रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचा भाग असलेल्या बसिज मिलिशियाच्या जवानांनी निदर्शकांवर गोळीबार केल्याचे तसेच अश्रुधूराचा वापर केल्याच्या बातम्याही आल्या आहेत. एका ठिकाणी निदर्शकांनी हिजाबसक्तीचे समर्थन करणाऱ्या स्थानिक धार्मिक नेत्याला मारहाण केल्याची व्हिडिओही समोर आली होती. तर रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या जवानांनी निदर्शकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही होत आहे. याशिवाय राजवटविरोधी निदर्शनांवर चाप बसविण्यासाठी इराणने अटकेत असलेल्या निदर्शकांविरोधात कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत. सर्वप्रथम हजार निदर्शकांवर न्यायालयीन कारवाई केली जाईल व यातील दोषींना मृत्यूदंडाची शिक्षाही सुनावली जाईल, असे इराणच्या न्यायालयाचे म्हणणे आहे.

दरम्यान, सहा आठवड्यांपासून पेटलेल्या या निदर्शनांमुळे इराणची राजवट दडपणाखाली आल्याचा दावा केला जातो. हे आंदोलन चिरडण्यासाठी इराणची राजवट वेगवेगळे पर्याय शोधत आहे. पण इराणमधील सुशिक्षित बुद्धिमंत वर्ग या निदर्शनात सहभागी झाल्यामुळे इराणच्या राजवटीची कोंडी झाल्याचे दिसत आहे.

leave a reply