तेहरान – माहसा अमिनी या २२ वर्षीय कुर्द तरुणीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये राजवटीच्या विरोधात पेटलेली निदर्शने अधिकाधिक तीव्र बनत चालली आहेत. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थींनंतर शिक्षकांनी देखील या हिजाबसक्तीच्या विरोधातील निदर्शनांना समर्थन जाहीर केले आहे. यामुळे इराणमधील विद्यापीठे आंदोलनाची केंद्र बनली आहेत. इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातही इराणच्या राजवटीच्या विरोधात नव्याने निदर्शने सुरू झाली. इराणच्या सुरक्षा यंत्रणेने गेल्या महिन्याभरात या निदर्शकांवर केलेल्या कारवाईत अडीचशे जणांचा बळी गेला तर १२ हजाराहून अधिकजणांना अटक केली आहे.
गेल्या पाच आठवड्यांपासून इराणमध्ये हिजाबसक्तीच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्या राजवटीला आव्हान देणारी ही निदर्शने दडपण्यासाठी इराणच्या यंत्रणांकडून जोरदार कारवाई सुरू आहे. यामध्ये १४-१६ वर्षांच्या विद्यार्थीनींची बेदरकाररित्या हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर या निदर्शनांची तीव्रता वाढली आहे. या कारवाईत अडीचशे जणांचा बळी गेल्याचा दावा इराणच्या यंत्रणा करीत असल्या तरी ही संख्या दुपटीहून अधिक असल्याची टीका युरोपमध्ये स्थित खामेनी राजवटविरोधी संघटना करीत आहेत.
आत्तापर्यंतच्या या निदर्शनांमध्ये इराणमधील विद्यार्थी तसेच तरुणवर्ग, इंधन कर्मचारी, व्यापारीवर्ग आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहभाग घेतला होता. पण दोन दिवसांपूर्वी ‘कोऑर्डिनेटिंग काऊन्सिल ऑफ इरानियन टिचर्स ट्रेड असोसिएशन्स’ या शिक्षकांच्या संघटनेने देखील राजवटविरोधी निदर्शनांना समर्थन दिले आहे. तसेच देशव्यापी संप पुकारण्याची हाक या शिक्षकांनी आपल्या सहकाऱ्यांना दिली आहे. तर विद्यार्थ्यांच्या गटाने इराणमधील ट्रक चालकांनाही या निदर्शनांमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे देशव्यापी बनत असलेली ही निदर्शने इराणच्या राजवटीसाठी आव्हान ठरू लागली आहेत.
इराणमधील प्रभावी नेते देखील या निदर्शनांना समर्थन देत असल्याच्या बातम्या येत आहेत. ‘निदर्शकांना देशाच्या नेत्यांवर टीका करण्याचा, देशाच्या नेतृत्वाशी दुमत असण्याचा पूर्ण अधिकार आहे’, असे इराणमधील शियापंथियांचे धार्मिक नेते जावेद अलावी-बोरुजेर्दी यांनी म्हटले आहे. २० व्या शतकात इराणमधील आघाडीचे धार्मिक नेते राहिलेल्या हुसेन बोरुजेर्दी यांचे अलावी हे नातू आहेत. काही दिवसांपूर्वी इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अली अकबर रफ्संजानी यांच्या मुलीने देखील निदर्शकांना समर्थन दिले होते. तर खामेनी यांचे समर्थक असलेल्या हुसेन नूरी हमेदानी यांनी देखील निदर्शकांच्या मागण्या ऐकून घेण्याचा प्रस्ताव दिला होता.
इराणमधील धार्मिक व राजकीय नेत्यांनी देखील निदर्शकांची बाजू उचलून धरल्यामुळे खामेनी यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यातच इराणचे खेळाडू आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुनही हिजाबसक्तीच्या विरोधात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या आठवड्यात इराणची महिला खेळाडू एल्नाझ रेकाबी हिने दक्षिण कोरियातील स्पर्धेत हिजाब न घालताच सहभाग घेतला होता. रेकाबीने दाखविलेल्या हिमतीचे सर्वच स्तरातून कौतूक झाले होते. पण इराणमध्ये परतलेल्या रेकाबी हिला नजरकैद केल्याच्या बातम्या आल्या होत्या.
दरम्यान, आपल्या देशातील दंगल, हिंसाचार व अस्थैर्यासाठी अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप इराण करीत आहे. इराणच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणाऱ्या अमेरिकेच्या विरोधात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगटनेकडे दाद मागणार असल्याचे इराणने म्हटले आहे. तर निदर्शकांवर कारवाई करणाऱ्या इराणवर अधिक निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिका व युरोपिय महासंघ देत आहे.