‘चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी’च्या प्रमुखपदी जनरल नरवणे यांची नियुक्ती

नवी दिल्ली – भारताचे पहिले संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर नव्या संरक्षणदलप्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची ‘चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी’चे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जनरल नरवणे दिवंगत जनरल रावत यांच्यानंतर संरक्षणदलांचे सर्वात ज्येष्ठ लष्करी अधिकारी बनले आहेत. नव्या संरक्षणदलप्रमुखांची नियुक्ती होईपर्यंत जनरल नरवणे त्यांचे काम पाहणार असून त्यासाठी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे.

‘चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी’च्या प्रमुखपदी जनरल नरवणे यांची नियुक्तीसंरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांचा गेल्या आठवड्यात हेलिकॉप्टर दुर्घटनेत अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी संरक्षणदलाच्या ‘चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी’ची बैठक झाली. या बैठकीत जनरल रावत, त्यांची पत्नी मधुलिका व इतर लष्करी अधिकार्‍यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीनंतर जनरल नरवणे यांची ‘चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी’चे प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती देण्यात आली.

संरक्षणदलप्रमुख पदाची नियुक्ती होण्यापूर्वी तिन्ही संरक्षणदलाच्या प्रमुखांपैकी वरिष्ठ असणार्‍या अधिकार्‍यांकडे प्रमुख पद सोपविण्यात येत होती. त्याच अनुषंगाने जनरल नरवणे यांच्याकडे प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. सध्या हवाईदलाचे प्रमुख असणारे एअरचीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी सप्टेंबर महिन्यात आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. तर नौदलप्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार यांनी गेल्याच महिन्यात जबाबदारी स्वीकारली आहे.

‘चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी’चे प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यावर जनरल नरवणे यांनी सौदी अरेबियाचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल फाहद बिन अब्दुल्लाह अल-मुतेर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यात द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जनरल रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर भारतीय संरक्षणदलांचे स्वतंत्र ‘थिएटर कमांड’ विकसित करण्याची प्रक्रिया काहिशी मंदावेल असे दावे केला जात होते.

मात्र जनरल रावत यांनी यासाठी पुढाकार घेतला व या प्रक्रियेचे नेतृत्त्वही तेच करीत होते. असे असले तरी पूर्णपणे व्यावसायिक असलेल्या भारतीय संरक्षणदलांच्या थिएटर कमांडच्या स्थापनेची प्रक्रिया त्याच वेगाने पुढे जाईल, असा विश्‍वास काही सामरिक विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

संरक्षणदलांच्या अद्ययावतीकरणाची प्रक्रिया पुढच्या काळात अधिकच गतीमान करण्यासाठी सरकार व संरक्षणदलांच्या प्रमुखांनी उत्सुकता दाखविलेली आहे. त्यामुळे नजिकच्या काळात याचे परिणाम दिसू लागतील, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

leave a reply