अम्मान – गेल्या दशकभराहून अधिक काळ सिरियाचा बहिष्कार केल्यानंतर अरब देशांनी सिरियन राष्ट्राध्यक्ष बाशर अल-अस्साद यांच्या सरकारशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर सिरियाचे परराष्ट्रमंत्री फैसल मकदाद यांनी जॉर्डनचा दौरा करुन परराष्ट्रमंत्री अयमन सफादी यांची भेट घेतली. जॉर्डनसह सौदी अरेबिया, युएई, इराक, इजिप्त सिरियाशी जुळवून घेण्यास तयार असताना अमेरिका आणि कतार याचा विरोध करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी सिरियाच्या जेद्दाह शहरात अरब देशांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली होती. यामध्ये सिरियाशी नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच सिरियाला अरब लीगमध्ये सामील करण्यावरही चर्चा पार पडली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी सिरियन परराष्ट्रमंत्र्यांनी जॉर्डनचा दौरा केला. सिरियन-जॉर्डनच्या परराष्ट्रमंत्र्यांमधील बैठकीनंतर सौदी, इजिप्त, इराकचे प्रतिनिधी देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. सिरियाचा वापर अरब देशांविरोधी कारवाईसाठी होऊ नये, यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचा दावा केला जातो.