लष्करप्रमुख जनरल नरवणे काश्मीर दौऱ्यावर

श्रीनगर – काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा चिथावणीखोर गोळीबार सुरूच असून गुरुवारी पूंछ आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार आणि मोर्टर्स हल्ले करण्यात आले. याला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. गेल्याच आठवड्यात भारतीय लष्कराने बोफोर्स तोफांचा भडीमार करत पीओकेच्या दूधनियाल सेक्टरमधील दशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले होते. यात पाकिस्तानचे १५ जवान आणि ८ दहशतवादी ठार झाले होते. या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख मनोज नरवणे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत.

काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर सध्या जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. काश्मीरमधील बर्फ वितळू लागले असून याचा फायदा घेत दहशतवादी घुसखोरीचे प्रयत्न करीत आहेत. सीमेपलीकडे सुमारे २०० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. तसेच कोरोनाव्हायरसची लागण झालेल्यांना काश्मीरमध्ये घुसवून ‘कोव्हिड टेररिझम’चा कट पाकिस्तानने आखल्याचे अहवाल समोर आले होते. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे सर्व डाव उधळून लावण्यासाठी भारतीय लष्कराने मोहीम हाती घेतली आहे. लष्कराच्या १५ कोर कमांडकडून दहशतवादविरोधी आणि घुसखोरीविरोधी मोहीम हाती घेण्यात आली असून ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे आपल्या काश्मीर दौऱ्यात याच मोहिमेचा आढावा घेणार आहेत. ते नियंत्रण रेषेवरील सीमा चौक्यांनाही भेट देणार आहेत. तसेच १५ कोरचे प्रमुख लेफ़्टनंट जनरल वाय. के. जोशी यांच्यसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा करतील. तसेच काश्मीरमध्ये लष्कराने कोरोनाव्हायरसच्या साथीचा सामना करण्याकरिता केलेल्या तयारीचाही आढावा लष्करप्रमुखांनी गुरुवारी घेतला.

भारतीय लष्कराने १० एप्रिल रोजी पीओकेच्या दुधनीयाल सेक्टरमधील दहशतवाद्यांचे तळ बोफोर्स आणि इतर तोफांचा मारा करून उडवून दिले होते. याच ठिकाणावरून ५ एप्रिल रोजी झालेला घुसखोरीचा मोठा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळला होता. यामध्ये ५ जवान शाहिद झाले होते, तर ५ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने ही कारवाई केली होती. यामध्ये दहशतवाद्यांचे तळ, शस्त्रकोठारे नष्ट करण्यात आली. तसेच यामध्ये पाकिस्तानचे १५ सैनिक आणि ८ दहशवादी ठार झाल्याचा दावा भारतीय गुप्तचर यंत्रणेने केला होता.

या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचा एक ब्रिगेडिअरही मारला गेल्याच्या बातम्या आहेत. मात्र हा अधिकारी कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे दगावल्याचे सांगून पाकिस्तान ही बाब त्यांच्या जनतेपासून लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचीही चर्चा आहे. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानकडून होणारी गोळीबाराची तीव्रता अधिकच वाढली आहे. अशावेळी लष्कर प्रमुखांची ही काश्मीर भेट महत्वाची ठरते.

leave a reply