फखरीझादेह यांची हत्या म्हणजे युद्धाचा भाग

- हिजबुल्लाहच्या वरिष्ठ नेत्याची जळजळीत प्रतिक्रिया

बैरूत – ‘वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची हत्या इराणवरील हल्ल्याचा भाग आहे. लवकरच इराणकडून या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना योग्य ते प्रत्युत्तर मिळेल’, असा इशारा हिजबुल्लाहचा वरिष्ठ नेता शेख नईम कासेम याने दिला. अमेरिका आणि इस्रायल काहीतरी मोठे घडविण्याच्या तयारीत असल्याचा इशारा हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याने दोन आठवड्यांपूर्वी दिला होता. म्हणूनच आखातातील इराणसंलग्न गटांनी अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यांसाठी तयार रहावे, अशी सूचना नसरल्लाने केली होती. सिरिया, इराकमधील इराणसंलग्न गटांना ही सूचना केल्यानंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌सचे वरिष्ठ अधिकारी हिजबुल्लाहच्या वरिष्ठ कमांडरने इराकमध्ये जाऊन इराणसंलग्न गटांच्या कमांडर्सची भेट घेतल्याची बातमीही समोर आली होती.

शास्त्रज्ञ फखरीझादेह यांच्या हत्येवर टीका करताना हिजबुल्लाहचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता नईम कासेम याने इराणकडून हल्लेखोरांना प्रत्युत्तर दिले जाईल, असे सांगितले. तसेच या कारवाईत हिजबुल्लाहला सहभागी होण्याची गरज भासणार नसल्याचे कासेम याने म्हटले आहे. त्याचबरोबर अमेरिका किंवा इस्रायल इराणवर थेट हल्ला चढविणार नसल्याचा दावा कासेमने केला. कारण तसे झाले तर या क्षेत्रातच युद्धाचा भडका उडेल. मात्र याची अजिबात शक्यता नाही, असा दावा कासेम याने केला.

शुक्रवारी इराणमध्ये मोहसिन फखरीझादेह यांची झालेली हत्या म्हणजे दहशतवादी हल्ला ठरतो, असे हिजबुल्लाहने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. इराणच्या वरिष्ठ शास्त्रज्ञाची हत्या म्हणजे भ्याड हल्ला असल्याची टीका हिजबुल्लाहने केली. त्याचबरोबर आपल्या शास्त्रज्ञावरील हल्लेखोरांना, मग ते कुणीही असो, इराण सर्वसामर्थ्यानिशी प्रत्युत्तर देईल, असा विश्‍वास हिजबुल्लाहने व्यक्त केला आहे. हिजबुल्लाह ही इराणसमर्थक संघटना मानली जाते. लेबेनॉनमध्ये फार मोठा प्रभाव असलेल्या हिजबुल्लाहने इराणच्या पाठिंब्यावर इराक व सिरियामध्येही आपला प्रभाव वाढविला होता. आवश्‍यकता भासली तर हिजबुल्लाह इस्रायलवर लाखो रॉकेटस्‌चा मारा करील, अशी धमकी या संघटनेच्या प्रमुखाने दिली होती. त्याची गंभीर दखल घेऊन इस्रायलने लेबेनॉनमधील हिजबुल्लाहच्या शस्त्रसाठ्यावर हल्ले चढविले होते.

हिजबुल्लाह, गाझापट्टीतील हमास व इस्लामिक जिहाद, येमेनमधील हौथी बंडखोर या इराणशी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटना आहेत. युद्ध भडकल्यास या सर्व संघटना इराणच्या बाजूने युद्धात उतरतील आणि इस्रायलवर एकाच वेळी हल्ला चढवतील, त्यासाठी इस्रायलने सज्ज रहावे, असा इशारा इस्रायलच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी फार आधी दिला होता.

leave a reply