बुर्किना फासोतील दहशतवादी हल्ल्यात ३० जणांचा बळी

- १२हून अधिक दहशतवाद्यांना ठार केल्याचा लष्कराचा दावा

३० जणांचा बळीओआगाडौगौ – आफ्रिकेच्या बुर्किना फासोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५ जवानांसह ३० जणांचा बळी गेला आहे. या हल्ल्याला लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात १२ हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या तीन महिन्यात बुर्किना फासोत झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आफ्रिकेतील ‘साहेल’ क्षेत्रापासून ते ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या भागापर्यंत दहशतवादाचा वणवा भडकला आहे, असा गंभीर इशारा दिला होता.

बुर्किना फासोच्या उत्तरेस नायजर सीमेजवळ असणार्‍या गावांना दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. मार्कोय शहरापासून सुमारे १० किलोमीटरवर असणार्‍या डमबम, गुवारा व तोकाबान्गो या गावांवर दहशतवादी गटाने हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये ११ गावकर्‍यांचा बळी गेला. यावेळी दहशतवाद्यांनी गावातील पाळीव प्राणी ताब्यात घेऊन अनेक घरे व मालमत्तांना आगी लावल्या.

३० जणांचा बळीहल्ल्याची माहिती मिळाल्यावर मार्कोयमधील लष्करी पथकाने तातडीने धाव घेतली. तोकाबान्गो गावाजवळ दहशतवादी व लष्करादरम्यान मोठा संघर्ष झाला. या संघर्षात १५ लष्करी जवानांचा बळी गेला. लष्कराबरोबर असणार्‍या नागरी सशस्त्र गटांमधील चार जणांचाही बळी गेल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली. कारवाईदरम्यान किमान १२ दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या असून इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नसली तरी आयएस व अल कायदासंलग्न गटाने हा हल्ला केल्याचा दाट संशय व्यक्त केला जातो. गेल्या तीन महिन्यातील हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला ठरला आहे. यापूर्वी नायजर सीमेजवळील बुर्किना फासोतील सोल्हान व नजिकच्या भागात झालेल्या हल्ल्यात १०० ते १५० जणांचा बळी गेला होता. हा बुर्किना फासोतील सर्वात मोठा व भीषण दहशतवादी हल्ला मानला जातो. २०१५ ३० जणांचा बळीसालापासून बुर्किना फासोत दहशतवादी हल्ल्यांची तीव्रता वाढली असून शेजारी देश माली व नायजरमधील दहशतवादी संघटना हल्ले चढवित असल्याचे दावे करण्यात येतात.

गेल्या काही वर्षात ‘साहेल रिजन’ व ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या भागात दहशतवादी संघटनांच्या कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, आफ्रिकी देश त्याचा मुकाबला करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. या देशांमध्ये माली, नायजर, बुर्किना फासो, चाड, नायजेरिया, सोमालिया, केनिया या देशांचा समावेश आहे. अल शबाब व बोको हराम या दहशतवादी संघटनांबरोबरच अल कायदा व आयएसही आफ्रिकेत आपला प्रभाव वाढवित असल्याचे समोर येत आहे.

बुर्किना फासोतील दहशतवादी हल्ल्यांमध्ये आतापर्यंत दीड हजारांहून अधिक जणांचा बळी गेला असून सुमारे १३ लाखजणांना विस्थापित व्हावे लागले आहे. सततच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जनतेत सरकारविरोधात तीव्र असंतोषाची भावना असून त्याविरोधात निदर्शनेही करण्यात येत आहेत.

leave a reply