सोमाली लष्कर व ‘अल शबाब’मधील संघर्षात 70हून अधिक जणांचा बळी

- अल शबाबच्या 40हून अधिक दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा

मोगादिशु – रविवारी सोमालियाचे लष्कर व ‘अल शबाब’ या दहशतवादी संघटनेत झालेल्या संघर्षात 70हून अधिक जणांचा बळी गेला आहे. ‘अल शबाब’ने गलमुदुग प्रांतातील लष्करी तळावर चढविलेल्या हल्ल्यानंतर हा संघर्ष पेटल्याचे सांगण्यात येते. लष्कराने 40 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती दिली आहे. तर ‘अल शबाब’ने 34 जवानांना मारल्याचा दावा केला. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या आफ्रिका कमांडचे प्रमुख जनरल स्टीफन जे. टाऊनसेंड यांनी आफ्रिकेत दहशतवादाचा वणवा भडकला आहे, असा गंभीर इशारा दिला होता.

सोमाली लष्कर व ‘अल शबाब’मधील संघर्षात 70हून अधिक जणांचा बळी - अल शबाबच्या 40हून अधिक दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावाअल शबाब या दहशतवादी संघटनेने रविवारी मध्य सोमालियातील गलमुदुग प्रांतात असलेल्या लष्करी तळावर भीषण हल्ला चढविला. गलमुदुगमधील विसिल शहरात जवळपास 100 दहशतवादी घुसले होते, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. अल शबाबच्या दहशतवाद्यांनी लष्करी तळानजिक दोन आत्मघाती कारबॉम्ब्सचा स्फोट घडविला व त्यानंतर तळावर गोळीबार सुरू केला. सोमालियाच्या लष्करासह स्थानिक सशस्त्र गटांनी अल शबाबच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले.

जवळपास एक तासाहून अधिक काळ संघर्ष सुरू होता, अशी माहिती लष्करी अधिकारी मेजर मोहमद अवाले यांनी दिली. संघर्षादरम्यान लष्कराच्या 17 जवानांसह 13 नागरिकांचा बळी गेला. 30हून अधिक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येते. ‘अल शबाब’ने मात्र हल्ल्यात 34 जवानांना ठार केल्याचा दावा केला आहे. सोमालियन लष्कर व स्थानिक सशस्त्र गटांनी दिलेल्या प्रत्युत्तरात 40हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती सरकारने दिली आहे.

सोमाली लष्कर व ‘अल शबाब’मधील संघर्षात 70हून अधिक जणांचा बळी - अल शबाबच्या 40हून अधिक दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावादोन महिन्यांपूर्वी अल शबाबने गलमुदुग प्रांतात चढविलेल्या हल्ल्यात बादवेन नावाचे शहर ताब्यात घेण्यात यश मिळविले होते. त्यावेळी झालेल्या संघर्षात लष्कर तसेच स्थानिक सुरक्षायंत्रणांना माघार घ्यावी लागली होती. या पार्श्‍वभूमीवर रविवारी सोमालियन लष्कराने चढविलेला प्रतिहल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो. या घटनेनंतर काही तासांनी सोमालियातील ‘पंटलॅण्ड’ प्रांतात अल शबाबच्या 21 दहशतवाद्यांना मृत्यूदंड देण्यात आल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

पंटलॅण्ड हा सोमालियातील स्वायत्त प्रांत असून स्थानिक प्रशासन व सुरक्षायंत्रणांनी अल शबाबविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. रविवारी देण्यात आलेला मृत्यूदंड त्याचाच भाग असल्याचे सांगण्यात येते. अल शबाब ही ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेली संघटना असून गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ सोमालियावर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ‘अल शबाब’ला रोखण्यासाठी अमेरिका व आफ्रिकन महासंघाने सोमालियाला सहाय्य पुरविले असले तरी अजूनही अल शबाबचा प्रभाव संपविण्यात यश आले नसल्याचे नव्या हल्ल्यांवरून स्पष्ट होत आहे.

leave a reply