ऑस्ट्रेलिया जपानचा सामरिक भागीदार देश – जपानच्या वरिष्ठ अधिकार्‍याची घोषणा

टोकिओ – ‘ऑस्ट्रेलिया जपानचा सामरिक भागीदार देश असून नव्या सहकार्यामुळे उभय देशांमधील रणनीतिक सहकार्य वाढेल’, अशी घोषणा जपानच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी केली. जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या हवाईदलांमध्ये आंतर संचालन अर्थात इंटरआपरेबिलिटी अंतर्गत महत्त्वाचा करार पार पडला. यानिमित्ताने जपानच्या हवाईदलाने ऑस्ट्रेलियाबरोबरचे सहकार्य अधोरेखित केले. गेल्या काही दिवसांपासून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या आक्रमकतेविरोधात जपान आणि ऑस्ट्रेलियातील सहकार्य वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी या दोन्ही देशांनी चीनच्या वाढत्या धोक्याचा उल्लेख करुन संरक्षण सहकार्य वाढविण्याची घोषणा केली होती.

सामरिक भागीदार देशजून महिन्याच्या सुरुवातीला जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व संरक्षणमंत्र्यांमध्ये टू-प्ल्स-टू चर्चा पार पडली होती. ईस्ट आणि साऊथ चायना सीमधील चीनच्या वाढत्या आक्रमकतेवर टीका करुन जपान आणि ऑस्ट्रेलियाने संरक्षण सहकार्य वाढविण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर येत्या काळात तशीच परिस्थिती निर्माण झाल्यास, ऑस्ट्रेलियन विनाशिका आणि लढाऊ विमानांचे संरक्षण करण्याचे जपानने मान्य केले होते. जपान आणि ऑस्ट्रेलियातील या सहकार्यावर चीनने संताप व्यक्त केला होता.

सामरिक भागीदार देशउभय देशांच्या सामरिक सहकार्याचा पुढचा टप्पा सुरू झाला असून शुक्रवारी जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या हवाईदलामध्ये इंटरआपरेबिलिटी करार पार पडला. या करारानुसार, एकमेकांच्या विमानांना हवेतच इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध होईल. मुक्त आणि स्वतंत्र इंडो-पॅसिफिक क्षेत्राचा पुरस्कार व त्याच्या भक्कम आधारासाठी हे सहकार्य आवश्यक असल्याचे जपानच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्पष्ट केली. ऑस्ट्रेलिया जपानचा सामरिक भागीदार देश आहे. या नव्या सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील रणनीतिक सहकार्य वाढेल, असे जपानच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेसाठी काही दिवसांपूर्वी जपान, ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर अमेरिका आणि ब्रिटनच्या नौदलामध्ये विशेष सराव पार पडला होता. या क्षेत्रातील द्विपसमुहांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चार देशांमध्ये हा सराव झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. या सरावावर चीनने आक्षेप घेतला होता. दरम्यान, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नौदलाचा सराव पार पडणार आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलियातील या सरावात जपान देखील सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. यानंतर ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका देखील या क्षेत्रात दाखल होईल.

leave a reply