चीनच्या आक्रमक धोरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑस्ट्रेलिया संरक्षणविषयक धोरणात मोठे बदल करणार

भारत, जपानबरोबर लष्करी सहकार्य वाढविण्यावर भर देणार

jinping militaryकॅनबेरा – दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने आपल्या संरक्षण धोरणात फार मोठे बदल केले आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील महत्त्वाचा देश असलेला ऑस्ट्रेलियाचे लष्कर स्वसंरक्षणासाठी सज्ज नसल्याची कबुली ऑस्ट्रेलियाच्या नव्या संरक्षण धोरणात देण्यात आली आहे. त्याचबरोबर या क्षेत्रातील चीनची आक्रमकता लक्षात घेता; ऑस्ट्रेलियाने लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, आण्विक पाणबुडीची खरेदी आणि उत्तरेकडील लष्करी तळांचे अद्ययावतीकरण यांना आत्यंतिक महत्त्व दिले आहे. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी याची घोषणा केली.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या तत्कालिन सरकारने ‘डिफेन्स स्ट्रॅटेजिक रिव्ह्यू-डिएसआर’ तयार केला होता. पंतप्रधान अल्बानीज यांनी यामध्ये मोठ्या सुधारणा सुचविल्या असून यावर तातडीने कारवाई करण्यासाठी १२ अब्ज डॉलर्स खर्च करणार असल्याचा दावा केला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने आपल्या संरक्षण धोरणाला एवढ्या मोठ्या प्रमाणात महत्त्व दिले आहे. जगभरात मोठ्या उलथापालथी सुरू असताना ऑस्ट्रेलियाला मागे राहता येणार नाही. सध्याच्या क्षेपणास्त्र युगात ऑस्ट्रेलियाला अलिप्त राहता येणार नाही, असे या ‘डिएसआर’मध्ये म्हटले आहे.

australia albanese defence११० पानाच्या या डीएसआरमध्ये दुसरे महायुद्ध आणि चीनच्या लष्करी आक्रमकतेचा उल्लेख केला आहे. ‘दुसऱ्या महायुद्धानंतर इतर कुठल्याही देशाने केला नसेल, तितक्या वेगाने चीनने मोठी लष्करी सज्जता केली आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेची हमी न देता किंवा अपारदर्शी लष्करी धोरण ठेवून चीन या हालचाली करीत आहे’, याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. ईस्ट आणि साऊथ चायना सीमधील चीनच्या नौदलाच्या हालचालींचा उल्लेखही यात करण्यात आला आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात या घडामोडी सुरू असताना, ऑस्ट्रेलिया स्वसंरक्षणासाठी सज्ज नसल्याची जाणीव यात करून देण्यात आली.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची संरक्षणसज्जता वाढविण्यासाठी अल्बानीज सरकारने सहा कलमी योजनांवर तातडीने काम करण्याला प्राधान्य दिले. यामध्ये ‘ऑकस’ देशांच्या सहाय्याने आण्विक पाणबुडीची खरेदी, लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सज्ज होण्याला यात महत्त्व देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाने ५०० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करावी, असे यात सुचविले आहे. चीनसारख्या आक्रमक देशाला ऑस्ट्रेलियाच्या सीमेपासून दूर ठेवण्यासाठी ही सज्जता आवश्यक असल्याचे येथील लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर उत्तरेकडील लष्करी तळांच्या अद्ययावतीकरणाचा मुद्दाही यात मांडण्यात आला आहे.

पंतप्रधान अल्बानीज यांनी या डीएसआरवर बोलताना सदर सुधारणा ऑस्ट्रेलियाला अधिकाधिक स्वयंपूर्ण, सज्ज आणि संरक्षित करतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच ‘या सुधारणा केल्या तर ऑस्ट्रेलियाचा येणारा काळ बदलेल अन्यथा येणारा काळ ऑस्ट्रेलियाला बदलेल’, असा इशारा अल्बानीज यांनी दिला.

leave a reply