अझरबैजान-तुर्कीतील सहकार्याने इराणची चिंता वाढली

- अझरबैजान-आर्मेनियामध्ये नव्या संघर्षाची शक्यता

अझरबैजान-तुर्कीबाकू/तेहरान – आर्मेनियापासून थेट तुर्कीपर्यंत मार्ग खुला करून देण्यासाठी अझरबैजानने हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे इराण अस्वस्थ बनला आहे. कारण अझरबैजानच्या या प्रयत्नांमुळे तुर्कीला थेट मध्य आशियाई देशांपर्यंतचा व्यापारी मार्ग खुला होईल. मात्र यामुळे आपली सुरक्षा धोक्यात येईल, अशी चिंता इराणला सतावित आहे. काही दिवसांपूर्वीच अझरबैजानने इस्रायलमध्ये आपला दूतावास सुरू केला होता. इस्रायल व अझरबैजानमधील वाढते लष्करी सहकार्य देखील इराणच्या चिंतेत अधिक भर टाकत आहे. गेल्या महिन्यापासून इराण आणि अझरबैजानच्या सीमेवर तणाव वाढू लागला आहे. इराणच्या लष्कराने अरास नदीच्या क्षेत्रात आणि अझरबैजानच्या सीमेजवळ युद्धसरावाचे आयोजन केले होते. अरास नदीचे क्षेत्र हे अझरबैजान, आर्मेनिया आणि इराणमधील वादाचा विषय ठरतो. त्यातच इराणने आर्मेनियाच्या दक्षिणेकडील ‘स्यूनिक’ शहरात उच्चायुक्तालय सुरू केले. आर्मेनिया आणि अझरबैजानमधील सीमावादामध्ये स्यूनिक शहराचा देखील समावेश आहे. यानंतर अझरबैजानने इराणच्या राजदूतांना समन्स बजावले होते.

२०२० साली आर्मेनियाबरोबर पेटलेल्या संघर्षात अझरबैजान याच स्यूनिक शहराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. या स्यूनिक शहराच्या पश्चिमेकडे नाखशिवान तर पूर्वेकडे अझरबैजान आहे. संघर्षबंदीनंतर आर्मेनियाने अझरबैजानला व्यापारासाठी या नाखशिवान मार्गाचा वापर करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतरही अझरबैजानने नाखशिवानचा ताबा घेण्याचे इरादे बोलून दाखविले होते. अझरबैजानच्या या धमक्यांवर इराणने त्यावेळी चिंता व्यक्त केली होती. पण अझरबैजानने आर्मेनियासह इराणलाही यावर इशारा दिला होता.

अझरबैजानने याच नाखशिवान भागाला तुर्कीशी जोडून व्यापार सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. हा मार्ग मिळाला तर इराण वगळून थेट मध्य आशियाई देशांपर्यंत पोहोचणे तुर्कीला शक्य होईल. यामुळे तुर्कीचा व्यापारी व आर्थिक फायदा होईल व त्याचबरोबर सामरिकदृष्ट्या तुर्कीचे सामर्थ्य वाढेल, असा दावा केला जातो. तुर्कीश भाषा बोलणारे तुर्की, अझरबैजान, किरगिझिस्तान व इतर मध्य आशियाई देश यामुळे अधिक जवळ येऊ शकतात. यामुळे आपली सुरक्षा धोक्यात येईल, अशी चिंता इराणला सतावित आहे. दरम्यान, तुर्की आणि अझरबैजानमध्ये नाखशिवान कॉरिडोर सुरू झालाच तर रशिया व कॉकेशस भागाला जोडणारा मार्ग इराणसाठी बंद होऊ शकतो. तुर्की हा नाटोचा सदस्य देश असल्यामुळे इराणविरोधी कारवाईसाठी नाटो देखील या कॉरिडोरचा वापर करू शकते. तर तुर्कमेनिस्तानचा नैसर्गिक इंधनवायू पुरवठा तुर्की व पुढे युरोपिय देशांसाठी सोपा होईल आणि यामुळे इंधनाची निर्यात करणाऱ्या इराणचे मोठे नुकसान होऊ शकते.

leave a reply