रशियाच्या ‘गाझप्रोम’चा युरोपातील इंधनपुरवठ्यावरून नवा इशारा

‘गाझप्रोम’मॉस्को – मोल्दोव्हाला करण्यात येणाऱ्या इंधनपुरवठ्यातील काही हिस्सा युक्रेनने स्वतःकडे वळविल्याचा आरोप गाझप्रोम या रशियन इंधनकंपनीने केला. जर युक्रेनने इंधनचोरी थांबविली नाही व मोल्दोव्हा इंधनाची देणी भरण्यात अपयशी ठरला तर पुढील काळात इंधनपुरवठ्यात कपात करण्याचा इशारा रशियन कंपनीने दिला. रशियाकडून युक्रेनमधील इंधनवाहिनींच्या माध्यमातून युरोपिय देशांना करण्यात येणारा इंधनवायू पुरवठा जवळपास ठप्प असून फक्त मोल्दोवाला जाणारी इंधनवाहिनी कार्यरत आहे. पण आता त्यातून करण्यात येणारा पुरवठाही रोखण्याचे संकेत रशियाने दिले आहेत.

‘गाझप्रोम’युक्रेनच्या शेजारी असणारा मोल्दोव्हा हा देश मोठ्या प्र्रमाणावर रशियन इंधनावर अवलंबून आहे. इतर युरोपिय देश रशियन इंधनाची आयात कमी करीत असले तरी मोल्दोव्हासमोर दुसरा पर्याय नसल्याने या देशाने रशियन आयात अद्यापही सुरू ठेवली आहे. रशियाच्या मागण्या मान्य करून मोल्दोव्हाने नोव्हेंबर महिन्यातील इंधनासाठीही आगाऊ रक्कम जमा केली आहे. मात्र रशियाकडून पुरवठा होणार इंधनवायू पूर्णपणे मोल्दोव्हाला मिळत नसल्याचा दावा गाझप्रोम या कंपनीने केला.

युक्रेनने रशियाकडून मोल्दोव्हामध्ये जाणाऱ्या इंधनवायूपैकी तब्बल पाच कोटी घनमीटरहून अधिक इंधनवायू आपल्या ताब्यात ठेवल्याचा आरोप गाझप्रोमकडून करण्यात आला. युक्रेनने ही इंधनचोरी थांबविली नाही तर २८ नोव्हेंबरपासून मोल्दोव्हाच्या इंधनवायू पुरवठ्यात कपात करण्याचा इशारा रशियन कंपनीने दिला आहे. युक्रेनने रशियाचे आरोप फेटाळले असून हिवाळ्यातील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रशिया ‘ब्लॅकमेल’ करीत असल्याचा ठपका ठेवला आहे.

‘गाझप्रोम’रशियाच्या घणाघाती क्षेपणास्त्रहल्ल्यांमुळे युक्रेनमधील अर्ध्याहून अधिक वीजपुरवठा यंत्रणा उद्ध्वस्त झाली आहे. युक्रेनची राजधानी किव्हसह अनेक शहरांमधील तब्बल एक कोटी नागरिकांचा वीज तसेच पाणीपुरवठा खंडित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच, देशातील वीज वाचविण्यासाठी युक्रेनी नागरिकांनी देश सोडण्याचा पर्याय स्वीकारावा, असा सल्ला ‘डीटीईके’ या युक्रेनमधील आघाडीच्या वीजकंपनीने दिला होता. त्याचवेळी, युक्रेनला सहाय्य करणाऱ्या देशांनी ब्लँकेट्सचा तातडीने पुरवठा करावा, अशी विनंतीही युक्रेन सरकारकडून करण्यात आली होती.

गेल्या काही दिवसात युक्रेनच्या विविध भागांमधील तापमान शून्य अंशाच्या जवळपास पोहोचले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ साचण्यासही सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत वीज तसेच ‘हिटिंग यंत्रणा’ उपलब्ध नसणे युक्रेनी जनतेसमोरील आव्हाने अधिक वाढविणारे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर रशियन कंपनीने युक्रेनवर इंधनवायूच्या चोरीबाबत केलेला आरोप लक्ष वेधून घेणारा ठरतो. रशियाकडून होणारा इंधनवायू पुरवठा बंद असल्याने युरोपिय देशांनाही कडक हिवाळ्याला तोंड द्यावे लागण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील महिन्यात युरोपिय देशांकडून रशियन इंधनावर ‘प्राईस कॅप’चीही अंमलबजावणी सुरू होणार असून त्यापूर्वी युरोपिय देशांनी इतर माध्यमातून रशियन इंधनाची खरेदी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

leave a reply