काराबाखच्या टेकड्यांवर ताबा मिळविल्याचा अझरबैजानच्या लष्कराचा दावा

-अमेरिका व रशियाकडून प्रतिक्रिया

Nagorno-Karabakh-Attackबाकू/मॉस्को/वॉशिंग्टन – नागोर्नो-काराबाखच्या भागात अझरबैजान व आर्मेनियन लष्करात पेटलेल्या संघर्षात तीन जवानांचा बळी गेला. यावेळी झालेल्या संघर्षात काराबाखच्या काही टेकड्यांवर ताबा मिळविल्याचा दावा अझरबैजान करीत आहे. तसेच आर्मेनियन लष्कराने संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप अझरबैजानने केला. माजी सोव्हिएत देशांमध्ये पेटलेल्या या संघर्षावर रशियाने चिंता व्यक्त करून या संघर्षाला अझरबैजान जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. अमेरिकेने दोन्ही मध्य आशियाई देशांना शांततेचे आवाहन केले आहे.

सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर १९९४ साली अझरबैजान व आर्मेनियामध्ये संघर्ष पेटला होता. त्यावेळी अझरबैजानमध्ये असलेल्या नागोर्नो-काराबाख या भागाचा आर्मेनियन लष्कराने ताबा घेतला होता. तेव्हापासून गेली ३० वर्षे हा भूभाग वादग्रस्त म्हणून ओळखला जातो. २०२० साली या वादग्रस्त भूभागावर नियंत्रण मिळविण्यासाठी अझरबैजान व आर्मेनियामध्ये संघर्ष पेटला होता. तुर्की व पाकिस्तानच्या लष्कराचे समर्थन मिळालेल्या अझरबैजानने या संघर्षात आर्मेनियावर मात केली होती. रशियाने या दोन्ही देशांमध्ये संघर्षबंदी घडवून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता.

Nagorno-Karabakh_Mapपण गेल्या काही आठवड्यांपासून या भागात तणाव निर्माण झाला होता. बुधवारी नागोर्नो-काराबाखमध्ये अझरबैजान व आर्मेनियन लष्करात पेटलेल्या संघर्षात तीन जणांचा बळी गेला. यामध्ये आर्मेनियन लष्कराच्या दोन जवानांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या संघर्षात १४ आर्मेनियन जवान जखमी झाले. अझरबैजानने आर्मेनियन लष्कराच्या ताब्यातील काही टेकड्यांवर नियंत्रण मिळविल्याचा दावा केला. तसेच आर्मेनियाने संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने केला.

मात्र, अझरबैजाननेच दोन वर्षांपूर्वीच्या संघर्षबंदीचे उल्लंघन करून या भूभागावर हल्ले चढविल्याचा ठपका रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने ठेवला आहे. येथील सारीयाबा टेकड्यांवरील संघर्षासाठी पूर्णपणे अझेरी लष्कर जबाबदार असल्याची टीका रशियाने केली. दरम्यान, युक्रेनच्या युद्धात रशिया अडकलेला असताना अझरबैजान-आर्मेनियातील संघर्ष आपल्या देशाची चिंता वाढविणारा ठरू शकतो, असे रशियन माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply