बांधकाम क्षेत्रातील बुडित कर्जांचा चीनच्या अर्थव्यवस्थेला दणका बसेल

- विश्‍लेषकांची चिंता

बीजिंग – चीनच्या बांधकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘एव्हरग्रॅन्ड’ तब्बल ३०० अब्ज डॉलर्सहून अधिक कर्ज फेडण्यात असमर्थ असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यापाठोपाठ दोन आघाडीच्या बहुराष्ट्रीय बँकांनी ‘फँटॅशिआ’ कंपनीचे रोखे तारण म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती उघड झाली आहे. एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांनी चीनच्या बांधकाम क्षेत्रातील बुडित कर्जांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यामुळे बॅकिंग क्षेत्रासह गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालचा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीलाच, चीनमधील कर्जाचा बोजा प्रचंड प्रमाणात वाढत असून खाजगी क्षेत्राची पतही घसरू लागल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बजावले होते. मात्र कर्जाचा बोजा व त्याच्याशी निगडीत धोके कमी करण्यासाठी चीनच्या राजवटीने कोणतीही पावले उचलली नाहीत. २०२१ सालच्या पहिल्या चार महिन्यातच चिनी कंपन्यांकडून कर्जाची परतफेड न करण्याचे प्रमाण वाढल्याचे एका अहवालामुळे स्पष्ट झाले आहे. ‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या चार महिन्यात चिनी कंपन्यांनी तब्बल १८ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड केलेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास ७० टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात येते.

कर्जाची परतफेड न करणार्‍या कंपन्यांमध्ये बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. चीनमधील पाच आघाडीच्या बँकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या सहा महिन्यातच मालमत्ता व बांधकाम क्षेत्रातील कंपन्याना दिलेली तब्बल १५ अब्ज डॉलर्सची कर्जे बुडित ठरली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बुडित कर्जांचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले. या वाढत्या कर्जाच्या बोज्यामुळे गेल्या सात महिन्यात २००हून अधिक बांधकाम व्यावसायिकांनी आपला गाशा गुंडाळल्याची माहिती ‘पीपल्स कोर्ट डेलि’ या सरकारी नियतकालिकाने दिली.

गेल्या काही आठवड्यात चीनच्या मालमत्ता व बांधकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणारी ‘एव्हरग्रॅन्ड’ सातत्याने अडचणीत येत असल्याचे समोर आले आहे. परदेशी वित्तसंस्थांनी या कंपनीचे रेटिंग कमी केले असून चीनमधील बँकांनीही कंपनीला नवे कर्ज देण्यात हात आखडता घेतला आहे. या कंपनीवर तब्बल ३०५ अब्ज डॉलर्सची कर्जे असून ती फेडण्यास कंपनी सक्षम नसल्याचे दावे करण्यात येत आहेत. वर्षभरात या कंपनीचे समभाग ७५ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. कंपनीला रोख्यांची विक्री करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यात चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट खाजगी उद्योगांवरील आपली पकड अधिक घट्ट करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे समोर येत आहे. त्यासाठी नवे कठोर नियम लागू करण्यात आले असून बँकांना कर्जांचे मनमानी वाटप करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचवेळी बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचीही वेगवेगळ्या टप्प्यात विभागणी करण्यात आली असून उपलब्ध निधी, मूल्य, कर्जाचा बोजा असे निकष लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील काळात चीनच्या बांधकाम क्षेत्रातील अधिकाधिक कंपन्या बुडित कर्जांच्या यादीत जाऊन दिवाळखोर होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

उत्पादन क्षेत्राबरोबरच बांधकाम क्षेत्र हादेखील चीनच्या अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटक मानला जातो. त्यामुळे या क्षेत्राला बसलेल्या धक्क्यांचे परिणाम बॅकिंग, शेअर मार्केट तसेच गुंतवणूक क्षेत्रात होतील, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यात चीनच्या खाजगी क्षेत्राला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसले आहेत. त्याचवेळी कोरोनाच्या नव्या लाटेने अनेक क्षेत्रांमध्ये घसरणीचे संकेतही मिळाले आहेत. त्यात बांधकाम क्षेत्र व बुडित कर्जांची भर पडल्यास चीनच्या अर्थव्यवस्थेला अधिक तीव्र फटका बसू शकतो.

leave a reply