बहारिनने इराण पुरस्कृत दहशतवादी हल्लांचा कट उधळला

दुबई – बहारिनमधील सार्वजनिक ठिकाणे आणि लष्करी तळांवर हल्ले चढविण्याचा मोठा कट उधळण्यात आला. इराण पुरस्कृत दहशतवादी संघटनेने हा कट आखला होता. जनरल कासेम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी हे हल्ले आखण्यात आले होते, अशी माहिती बहारिनच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने दिली. काही तासांपूर्वीच इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याने आखातातील अमेरिकेच्या तळांवर हल्ले चढविण्याची धमकी दिली होती.

बहारिनने इराण पुरस्कृत दहशतवादी हल्लांचा कट उधळलाबहारिनमधील ‘अल-अखबारिया’ वृत्तवाहिनी आणि ‘अखबार अल-खलिज’ या वर्तमानपत्राने या कटाची माहिती उघड केली. इराण पुरस्कृत ‘कासेम सुलेमानी ब्रिगेड’ या दहशतवादी संघटनेने ही योजना आखली होती. या कटामध्ये १८ जण सामील असून यापैकी नऊ जण इराणमध्ये असल्याचे बहारिनी वर्तमानपत्राने स्पष्ट केले. बहारिनमधील सार्वजनिक ठिकाणे तसेच लष्करी तळ या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती. या वर्षाच्या सुरुवातीला हा कट आखण्यात आला होता, अशी माहिती बहारिनच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने दिली.

बहारिनमध्ये अमेरिकेच्या पाचव्या आरमाराचे तळ असून युरोपिय देशांच्या युद्धनौका देखील बहारिनमध्येच तैनात असतात. त्यामुळे पाश्चिमात्य देशांच्या नौदल व लष्करी तळांना हल्ल्याचा कट होता, असाही दावा केला जातो. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने इराकमध्ये चढविलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख जनरल कासेम सुलेमानी व इतर दहशतवादी ठार झाले होते. त्यांच्या हत्येनंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसने आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. तर काही तासांपूर्वीच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याने लवकरच अमेरिकेच्या लष्करी तळांवरील हल्ला वास्तवात उतरवू, असे जाहीर केले आहे.

दरम्यान, बहारिनमधील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. गेल्या आठवड्यात बहारिनने इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित केल्यानंतर इराणकडून बहारिनला गंभीर परिणामांच्या धमक्या दिल्या जात आहेत. इस्रायलशी संबंध सुरळीत करुन बहारिनने आपल्या सुरक्षेला असलेला धोका वाढविल्याचा इशारा इराणने दिला होता. या पार्श्वभूमीवर, ‘कासेम सुलेमानी ब्रिगेड’ या दहशतवादी संघटनेबाबत आत्ताच प्रसिद्ध झालेल्या या इशार्‍याकडे पाहिले जाते.

leave a reply