बांगलादेशच्या पंतप्रधान भारताच्या भेटीवर

नवी दिल्ली – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना भारताच्या भेटीवर आल्या आहेत. परराष्ट्रमंत्री ए. जयशंकर यांनी पंतप्रधान शेख हसिना यांची भेट घेऊन चर्चा केली. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंतप्रधान शेख हसिना यांची चर्चा पार पडेल. यावेळी द्विपक्षीय सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या होणार असल्याचे सांगितले जाते. भारत पूर्वेकडील देशांबरोबर व्यापार वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करीत असून यामुळे भारताच्या बांगलादेशबरोबरील सहकार्याला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हनिसा यांची ही भारतभेट महत्त्वाची ठरते.

Jaishankarकोरोनाच्या साथीचा प्रभाव, युक्रेनचे युद्ध आणि कडाडलेल्या इंधन दरांचा बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे बांगलादेशातही श्रीलंकेसारखी स्थिती उद्भवेल का, अशी चर्चा सुरू झाली होती. पण पंतप्रधान शेख हसिना यांनी आपल्या देशाच्या आर्थिक स्थितीबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. असे असले तरी आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी बांगलादेश भारताबरोबरील सहकार्य अधिकच वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आधीच्या काळात भारताने बांगलादेशाला चार वेळा कर्जसहाय्य पुरविले होते. यामध्ये बंदरांचा विकास तसेच विमानतळाच्या विकासासाठी पुरविलेल्या निधीचा समावेश आहे. पुढच्या काळातही बांगलादेशाला भारताकडून मोठ्या प्रमाणात कर्जसहाय्य तसेच गुंतवणुकीची अपेक्षा असेल. पंतप्रधान शेख हसिना यांच्या या दौऱ्यात त्यावर महत्त्वपूर्ण चर्चा होईल, असे दावे केले जातात. मात्र बांगलादेशच्या सरकारने त्यावर माहिती दिलेली नाही.

भारतालाही पूर्वेकडील देशांशी व्यापार वाढविण्यासाठी बांगलादेशची अत्यंत आवश्यकता आहे. त्याचवेळी आपला हा शेजारी देश चिनी गुंतवणुकीच्या फासात अडकू नये, यासाठीही भारताने पावले उचलली होती. काही काळापूर्वी बांगलादेश देखील चीनच्या गुंतवणुकीच्या प्रलोभनात अडकला होता व चीनने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह’च्या अंतर्गत बांगलादेशात चार अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. पण कालांतराने बांगलादेशच्या सरकारने आपले काही प्रकल्प चीनच्या हातून काढून घेतले होते.

दरम्यान, भारताने बांगलादेशबरोबरील सीमावाद सोडविण्यासाठी करार करून यावरील वाद संपुष्टात आणला होता. मात्र दोन्ही देशांमध्ये वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीवाटपावर अजूनही भारत व बांगलादेशचे एकमत झालेले नाही. यासंदर्भात दोन्ही देशांच्या जॉईंट रिव्हर कमिशनची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी काही नद्यांच्या पाणीवाटपावर एकमत झाल्याचे दावे केले जातात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंतप्रधान शेख हसिना यांच्या भेटीत या नद्यांच्या पाणीवाटपाच्या करारावर स्वाक्षऱ्या होतील, अशी माहिती दिली जात आहे.

leave a reply