बांगलादेशकडून भारताला दोन बंदरांचा प्रस्ताव

ढाका – चट्टोग्राम व सिलहेट ही आपली अत्यंत महत्त्वाच्या बंदरांचा विकास भारताने करावा, असा प्रस्ताव बांगलादेशने दिला आहे. आधीच्या काळात चितगांव म्हणून ओळखले जाणारे चट्टोग्राम बंदर धोरणात्मकदृष्ट्या भारतासाठी खूपच महत्त्वाचे ठरते. त्यामुळे बांगलादेशकडून येत असलेला हा प्रस्ताव ही भारतासाठी स्वागतार्ह बाब ठरते. भारतीय विश्लेषकांशी चर्चा करताना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनीच हा प्रस्ताव दिल्याची माहिती स्थानिक वर्तमानपत्राने दिली आहे.

बांगलादेशकडून भारताला दोन बंदरांचा प्रस्तावदोन दिवसांपूर्वी भारत व बांगलादेशमध्ये 131 किलोमीटर इतक्या लांबीच्या इंधनवाहिनीचे उद्घाटन पार पडले. या पाईपलाईनमधून वर्षाकाठी भारत सुमारे दहा लाख मेकि टन इतके डिझेल बांगलादेशला पुरविणार आहे. बांगलादेशच्या उत्तरेकडील भागाला याचा फार मोठा लाभ मिळणार असून या डिझेलच्या वाहतुकीच्या खर्चात यामुळे फार मोठी कपात होणार आहे. त्यामुळे 377 कोटी रुपयांचा हा प्रकल्प बांगलादेशच्या इंधनसुरक्षेसाठी फार मोठे योगदान देणारा ठरेल. याच्या पाठोपाठ बांगलादेशच्या पंतप्रधानांनी भारताला आपल्या दोन मोक्याच्या बंदरांबाबतचा प्रस्ताव दिला.

यापैकी चट्टोग्राम बंदर भारताच्या ईशान्येकडील भागापासून खूपच जवळ असल्याने याचे व्यूहरचनात्मक महत्त्व अधिक आहे. यामुळे भारत व बांगलादेशमधील कनेक्टिव्हिटी अधिकच वाढेल. ‘ढाका ब्युिन’ नावाच्या बांगलादेशी वर्तमानपत्रात यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले. इंडिया फाऊंडेशन या अभ्यासगटाचे संस्थापक राम माधव यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत पंतप्रधान हसिना यांनी हा प्रस्ताव दिल्याचे ढाका ब्युिनने म्हटले आहे.

हा प्रस्ताव भारताकडून स्वीकारला जाण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशातील बंदरे विकसित करण्यासाठी तसेच या देशातील इतर पायाभूत सुविधांच्या विकासप्रकल्पांमध्ये चीनने विशेष स्वारस्य दाखविले होते. मात्र चीनची शिकारी अर्थनीति लक्षात घेऊन बांगलादेशाने चीनच्या गुंतवणुकीपासून सावध राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याच प्रमाणात बांगलादेशच्या सरकारने भारताबरोबरील आपल्या सहकार्यात वाढ करण्याची सूज्ञता दाखविली आहे. दोन्ही देश आपल्या चलनांमध्ये व्यवहार करण्याची तयारी करीत असून उभय देशांच्या अर्थव्यवस्थांना याचा फार मोठा लाभ मिळेल, असे दावे अर्थतज्ज्ञांकडून केले जातात.

या पार्श्वभूमीवर चट्टोग्राम व सिलहेट बंदरांच्या विकासाचा प्रस्ताव देऊन बांगलादेश भारताबरोबरील आपले सहकार्य अधिक व्यापक करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.

हिंदी English

 

leave a reply