अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हपाठोपाठ ‘बँक ऑफ इंग्लंड’कडूनही व्याजदरात वाढ जाहीर

आंतरराष्ट्रीय शेअरबाजारांमध्ये घसरण

Federal Reserveवॉशिंग्टन/लंडन – बुधवारी अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने केलेल्या व्याजदरवाढीच्या घोषणेनंतर ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकेनेही त्याचे अनुकरण केले. जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या या देशांनी व्याजदरात प्रत्येकी पाऊण टक्क्यांची वाढ केली आहे. अमेरिकेने आपला व्याजदर चार टक्क्यांपर्यंत नेला असून ब्रिटनमधील व्याजदर तीन टक्के झाला. हा २००८ सालानंतरचा उच्चांकी व्याजदर ठरला आहे. गेल्या २४ तासांमध्ये झालेल्या या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय शेअरबाजारांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. अमेरिकेसह युरोप व आशियातील शेअर निर्देशांकांमध्ये एक ते साडेतीन टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

US Federal Reserveरशिया-युक्रेन संघर्ष व जागतिक पुरवठा साखळीतील अडचणींमुळे जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांना सातत्याने धक्के बसत आहेत. अमेरिका व युरोपसह जगातील प्रमुख देशांमध्ये महागाईचा विक्रमी भडका उडाला आहे. इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले असून सामान्य जनतेला ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’चा सामना करावा लागत आहे. जगातील शेकडो कंपन्यांनी कर्मचारी कपातीला सुरुवात केली असून आर्थिक मंदीचे सावट असल्याचे इशारे जगातील आघाडीच्या वित्तसंस्थांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत महागाई रोखण्याचे कारण पुढे करीत, जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांकडून सातत्याने व्याजदरात वाढ करण्यात येत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बुधवारी केलेली पाऊण टक्क्यांची वाढ ही गेल्या आठ महिन्यांमधील सहावी दरवाढ ठरली आहे. तर व्याजदर ०.७५ टक्क्यांनी वाढविण्याची ही सलग चौथी वेळ ठरते. मात्र सातत्याने करण्यात येणाऱ्या या वाढींनंतरही अमेरिकेतील महागाईचा दर अजूनही आठ टक्क्यांच्या वर राहिल्याने दरवाढीचा परिणाम दिसून येत नसल्याचा सूर उमटू लागला आहे. फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीने फक्त अमेरिकी डॉलर मजबूत झाला असून त्याचे गंभीर परिणाम इतर देशांना भोगावे लागत आहेत.

अमेरिकेपाठोपाठ ‘बँक ऑफ इंग्लंड’नेही व्याजदरात पाऊण टक्क्यांची वाढ जाहीर केली. या घोषणेनंतर ब्रिटनमधील व्याजदर तीन टक्के झाला आहे. हा २००८ सालानंतरचा सर्वाधिक व्याजदर ठरतो. महागाई रोखण्यासाठी ही वाढ आवश्यक असल्याचे समर्थन ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकेकडून करण्यात आले. त्याचवेळी ब्रिटनला शतकातील सर्वात दीर्घकालिन आर्थिक मंदीला तोंड द्यावे लागेल, असा इशाराही बँक ऑफ इंग्लंड’ने दिला.

अमेरिका व ब्रिटनच्या व्याजदरवाढीचे परिणाम शेअरबाजारांवर उमटले आहेत. अमेरिकी शेअरनिर्देशांकांमध्ये दीड ते साडेतीन टक्क्यांची घसरण झाली. युरोपातील शेअरनिर्देशांकही एक टक्क्यांहून अधिक खाली आले. तर आशियाई शेअर निर्देशांकही अर्ध्या ते तीन टक्क्यांपर्यंत गडगडले आहेत. चलन बाजारपेठेत डॉलर भक्कम झाला असून जपानी येन, पौंड, युरो तसेच लिराचे मूल्य घसरले आहे.

leave a reply