बायडेन सौदीबाबत काय विचार करतात याची पर्वा करणार नाही

- सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान

दुबई – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आपल्याबाबत काय विचार करतात, याची मी पर्वा करीत नाही. अमेरिकेच्या हितसंबंधांचा विचार करून बायडेन यांनी आपले निर्णय घ्यावे. अमेरिकेच्या प्रश्‍नात हस्तक्षेप करण्याचा जसा सौदी अरेबियाला अधिकार नाही, अगदी त्याच धर्तीवर अमेरिकेनेही सौदीच्या कारभारात ढवळाढवळ करू नये’, अशा परखड शब्दात सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी बायडेन प्रशासनाला खडसावले. त्याचबरोबर येत्या काळात सौदी अमेरिकेतील आपली गुंतवणूक कमी करू शकतो, असे संकेत सौदीच्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी दिले आहेत.

गेल्या वर्षी बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यापासून सौदी अरेबियाबरोबरच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. २०१८ साली तुर्कीमध्ये सौदीचे पत्रकार जमाल खशोगी यांची हत्या, क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी घडवून आणल्याचा आरोप झाला होता. यावर बायडेन यांच्या डेमोक्रॅट पक्षाने आक्रमक भूमिका स्वीकारली होती. बायडेन राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर त्यांनी या मुद्यावर सौदीची कोंडी करून सौदीवर हल्ले चढविणार्‍या येमेनी बंडखोरांचा प्रोत्साहन देणारे निर्णय घेतले होते.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्याशी संपर्क साधण्याचे कटाक्षाने टाळले होते, ही बाब आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्षात आणून देत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील प्रसिद्ध मासिक ‘द अटलांटिक’ने क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना याबाबत प्रश्‍न केला. त्यावर बोलताना क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी बायडेन आपल्याबाबत काय विचार करतात, याची आपल्याला अजिबात पर्वा नसल्याचे ठणकावले.

त्याचबरोबर खशोगी हत्येप्रकरणावरुन मानवाधिकारांचा मुद्दा उपस्थित करणार्‍या बायडेन प्रशासन आणि इतर संघटनांवर क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी ताशेरे ओढले. ‘‘‘युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट्स’च्या अकराव्या कलमानुसार, गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत कुठलीही व्यक्ती निर्दोष मानली जाते. त्यामुळे आरोप सिद्ध होण्याआधीच दोषी ठरवून माझेच मानवाधिकार डावलण्यात आलेले आहेत’’, अस टोला क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी लगावला.

‘अमेरिकेबरोबरचे ऐतिहासिक संबंध कायम राखून ते अधिक भक्कम करणे, हे सौदीचे उद्दिष्ट आहे. सौदीने आत्तापर्यंत अमेरिकेत ८०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे’, याची आठवण सौदीच्या क्राऊन प्रिन्सनी अमेरिकन मासिकाशी बोलताना करुन दिली. तर येत्या काळात सौदी ही गुंतवणूक वाढवू शकतो किंवा कमीही करू शकतो, असा इशारा सौदीच्या सरकारी वृत्तसंस्थेशी बोलताना दिला आहे. दरम्यान, गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष राजकीय वाटाघाटीने सोडवावा आणि मध्यस्थीसाठी सौदी तयार असल्याचा प्रस्ताव क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी यावेळी दिला.

leave a reply