युक्रेनमधून बाहेर पडलेले निर्वासित शतकातील सर्वात मोठे संकट ठरेल

- संयुक्त राष्ट्रसंघटनेचा इशारा

युक्रेनमधून बाहेर पडलेले निर्वासितकिव्ह/ब्रुसेल्स – रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील जवळपास १० लाख नागरिकांनी दुसर्‍या देशात निर्वासित म्हणून आश्रय घेतला आहे. युक्रेनमधून बाहेर पडणार्‍या निर्वासितांचे लोंढे असेच कायम राहिले, तर हे २१व्या शतकातील निर्वासितांचे सर्वात मोठे व गंभीर संकट ठरेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला. ‘युएन हाय कमिशन फॉर रिफ्युजीज्’ने (युएनएचसीआर) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात दिवसात युक्रेनच्या एकूण लोकसंख्येपैकी दोन टक्क्यांहून अधिक जण देशाच्या बाहेर पडले आहेत. गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघटनेतील राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी युक्रेनमधून तब्बल ५० लाख नागरिक निर्वासित म्हणून इतर देशांमध्ये जाण्याची शक्यता आहे, असे बजावले होते.

गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर युक्रेनी नागरिकांची देश सोडण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. राजधानी किव्हसह पूर्व युक्रेन तसेच खारकिव्ह शहरातून मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडले असून कार तसेच रेल्वेच्या सहाय्याने देश सोडण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनचे शेजारी देश असणार्‍या पोलंड, स्लोव्हाकिया, हंगेरी, रोमानिया, मोल्दोव्हा या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात युक्रेनी नागरिकांचे लोंढे दाखल होत आहेत. दर तासाला युक्रेनच्या शेजारी देशांच्या सीमेवर हजारो नागरिक दाखल होत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघटनेकडून सांगण्यात आले.

युक्रेनमधून बाहेर पडलेले निर्वासितयुद्धाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या सात दिवसात युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिक बाहेर पडले आहेत. युक्रेनची लोकसंख्या सुमारे साडेचार कोटी असून बाहेर पडणार्‍या नागरिकांची संख्या दोन टक्क्यांहून अधिक आहे. अवघ्या सात दिवसात इतक्या प्रचंड संख्येने नागरिकांचे लोंढे बाहेर पडणे ही अभूतपूर्व घटना असल्याचे ‘युएन हाय कमिशन फॉर रिफ्युजीज्’ने (युएनएचसीआर) म्हटले आहे. आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत आपण प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांचे लोंढे बाहेर पडताना बघत आहोत, असा दावा ‘युएनएचसीआर’चे प्रमुख फिलिपो ग्रँडी यांनी केला.

सध्याच्या वेगाने युक्रेनमधून नागरिकांचे लोंढे बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू राहिल्यास हे निर्वासित या शतकातील सर्वात मोठे संकट ठरेल, असा इशारा ‘युएन हाय कमिशन फॉर रिफ्युजीज्’च्या (युएनएचसीआर) प्रवक्त्या शबिआ मन्टू यांनी दिला. ‘युएनएचसीआर’ तसेच इतर संघटनांनी युक्रेनमधून सुमारे ४० ते ५० लाख नागरिक निर्वासित म्हणून बाहेर पडण्याची शक्यता आहे, असे भाकित वर्तविले आहे. सध्या युक्रेनमधून बाहेर पडलेल्या नागरिकांपैकी ५० टक्के नागरिकांनी पोलंडमध्ये निर्वासित म्हणून आश्रय घेतल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघटनेने दिली.

गेल्या दशकात सिरियात झालेल्या युद्धात जवळपास ५७ लाख नागरिक निर्वासित म्हणून देशाबाहेर पडले होते.

leave a reply