फ्रान्स, ग्रीसमध्ये अब्जावधी युरोचा संरक्षण सहकार्य करार

- युरोपिय देशांनी संरक्षणसिद्धता वाढविण्याचा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा सल्ला

पॅरिस – फ्रान्स आणि ग्रीस या दोन युरोपिय देशांमध्ये मंगळवारी अब्जावधी युरोचा संरक्षण करार पार पडला. या करारानुसार, ग्रीस फ्रान्सकडून तीन अतिप्रगत विनाशिका खरेदी करणार आहे. या कराराच्या निमित्ताने फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी ग्रीसने दाखविलेल्या विश्‍वासाचे स्वागत केले. ‘युरोपिय देशांनी नकारात्मकता सोडून स्वाभिमानी बनावे व आपल्या संरक्षणसिद्धतेत वाढ करावी’, असा सल्ला मॅक्रॉन यांनी दिला. अमेरिका-ऑस्ट्रेलिया-ब्रिटनमधल्या ऑकस करारावर संतापलेल्या फ्रान्सच्या या आक्रमक हालचाली लक्ष वेधून घेणार्‍या ठरत आहेत.

फ्रान्स, ग्रीसमध्ये अब्जावधी युरोचा संरक्षण सहकार्य करार - युरोपिय देशांनी संरक्षणसिद्धता वाढविण्याचा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा सल्लाग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोताकिस यांनी मंगळवारी आपल्या शिष्टमंडळासह फ्रान्सचा दौरा केला. पंतप्रधान मित्सोताकिस यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी भेट घेऊन महत्तच्या संरक्षण आणि सुरक्षा विषयक सहकार्य कराराची घोषणा केली. या संरक्षण करारामुळे उभय देशांचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, क्षेत्रीय अखंडता संरक्षित करण्यास सहाय्य मिळेल, असा दावा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केला. यावेळी झालेल्या करारानुसार, ग्रीसने फ्रान्सकडून तीन विनाशिकांची खरेदी केली असून येत्या काळात चौथ्या विनाशिकेच्या खरेदीबाबतचा निर्णयही होऊ शकतो.

या वर्षाच्या सुरुवातीला ग्रीसने फ्रान्सकडून १८ रफायल लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला होता. या संरक्षण सहकार्यातील पुढील टप्पा म्हणून या विनाशिकांच्या खरेदीकडे पाहिले जाते. युरोपियन देशांच्या सामरिक स्वायतत्तेच्या दिशेने ग्रीस आणि फ्रान्सने पहिले धाडसी पाऊल उचलल्याची प्रतिक्रिया ग्रीसच्या पंतप्रधानांनी दिली. यामुळे भूमध्य समुद्रपासून ते आखातापर्यंतच्या आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्याचा युरोपचा मार्ग मोकळा होईल, असा दावा पंतप्रधान मित्सोताकिस यांनी केला.

फ्रान्स, ग्रीसमध्ये अब्जावधी युरोचा संरक्षण सहकार्य करार - युरोपिय देशांनी संरक्षणसिद्धता वाढविण्याचा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा सल्लातर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी अधिक आक्रमक भाषेचा वापर करून युरोपिय देशांना संरक्षणसिद्धता वाढविण्याचे आवाहन केले. याआधीही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी युरोपिय देशांना स्वत:ची संरक्षणसिद्धता वाढविण्याचे आणि अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्याचे सुचविले होते. अमेरिका, कॅनडा व युरोपिय देशांची लष्करी संघटना ‘नाटो’ देखील मृतवत होत असल्याची टिप्पणी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी केली होती.

दरम्यान, भूमध्य समुद्रात तुर्कीकडून असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर ग्रीसने फ्रान्सकडून विनाशिका खरेदी केल्याचा दावा केला जातो. पण गेल्या दहा दिवसात युरोपमधील बदलत्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, या संरक्षण कराराकडे पाहिले जाते.

leave a reply