‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ आंदोलनाचे समर्थन करणार नाही

- ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीति पटेल

‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’

लंडन – अमेरिकेत झालेल्या ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’च्या निदर्शनांना समर्थन देण्यासाठी ब्रिटनमध्ये ज्या प्रकारे आंदोलन झाले तो संपूर्ण प्रकार भयंकर होता आणि आपण त्याचे कधीही समर्थन करणार नाही, असे ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीति पटेल?यांनी बजावले आहे. ब्रिटनमधील एका रेडिओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री पटेल यांनी, ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ आंदोलनाशी निगडीत असलेल्या प्रतिकात्मक गोष्टींनाही विरोध दर्शविला असून मत व्यक्त करण्यासाठी इतर मार्ग आहेत, असे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी, ब्रिटनमध्ये वंशद्वेष व हवामानबदल यासारख्या मुद्यांवर होणार्‍या आंदोलनांमध्ये घुसखोरी करणार्‍या आक्रमक व अतिडाव्या गटांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पंतप्रधानांचे विशेष दूत व सल्लागार जॉन वुडकॉक यांच्या नेतृत्त्वाखाली ही चौकशी करण्यात येणार आहे. ब्रिटनमधील अतिडाव्या विचारसणीचा पक्ष म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘सोशॅलिस्ट वर्कर्स पार्टी’ने ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’सह हवामानबदल व इतर सामाजिक मुद्यांवर होणार्‍या आंदोलनात घुसखोरी केल्याचे दावे समोर आल्यानंतर चौकशीचे आदेश दिल्याचे मानले जाते.

‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’या पार्श्‍वभूमीवर, ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ आंदोलनावर केलेली टीका लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. शुक्रवारी गृहमंत्री पटेल यांनी ‘एलबीसी’ या रेडिओ स्टेशनला मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान सूत्रसंचालक निक फेरारी यांनी पटेल यांना ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’च्या मुद्यावर प्रश्‍न विचारला होता.

‘गुडघ्यात पाय वाकवून मानवंदना देण्याचा प्रकार मला मान्य नाही, मी तसेच करणार नाही. माझ्याकडे त्यासाठी वेळही नाही. आपले मत व्यक्त करण्याचे अनेक मार्ग लोकांसाठी उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये ज्या पद्धतीने ब्लॅक लाईव्हज् मॅटरच्या समर्थनार्थ निदर्शने झाली तो प्रकार योग्य नव्हता. ही निदर्शने अतिशय भयंकर होती. ब्रिटनमध्ये काही पुतळ्यांची तोडफोड व ते खाली आणण्याचे प्रकार घडले. इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे प्रयत्न मला मान्य नाहीत. अशा मुद्यांवर इतर मार्गांनी बोलणी होऊ शकते’, या शब्दात गृहमंत्री पटेल यांनी ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ आंदोलनाला धारेवर धरले.

अमेरिका व युरोपात डाव्या दांभिक विचारसरणीचे गट गेल्या काही वर्षात आक्रमक झाल्याचे दिसत असून त्याविरोधात आता तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाल्याचे ब्रिटनमध्ये सुरू झालेली चौकशी तसेच गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे.

leave a reply