सौदीतील पाश्चिमात्य राजनैतिक अधिकार्‍यांच्या कार्यक्रमावर बॉम्ब हल्ला

जेद्दाह – पहिल्या महायुद्धात बळी गेलेल्या जवानांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमावर कट्टरपंथियांनी चढविलेल्या हल्ल्यात किमान दहाजण जखमी झाले. तर या स्फोटात चार जणांचा बळी गेल्याचा दावा काही माध्यमे करीत आहेत. जखमींमध्ये ब्रिटीश तसेच ग्रीक नागरिक असल्याची माहिती समोर येत आहे. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने या भ्याड हल्ल्यावर टीका केली आहे. गेल्या १२ दिवसात जेद्दाह येथील पाश्चिमात्य देशांच्या संबंधितावर झालेला हा दुसरा हल्ला ठरतो.

बॉम्ब हल्ला

सौदीच्या जेद्दाह येथील फ्रान्सच्या दूतावासाने बुधवारी स्मरण दिवस आयोजित केला होता. पहिल्या महायुद्धात बळी गेलेल्या जवानांच्या स्मरणार्थ दफनभूमीत आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी फ्रान्ससह, ब्रिटन, ग्रीस, इटली तसेच अमेरिकेच्या दूतावासातील राजनैतिक अधिकारी तसेच सौदीचे सुरक्षारक्षक उपस्थित होते. दरवर्षी सौदीमध्ये या स्मरणदिनाचे आयोजन केले जाते. पण बुधवारच्या या कार्यक्रमाला कट्टरपंथियांनी लक्ष्य करून बॉम्ब हल्ला चढविला. फ्रान्सचे राजनैतिक अधिकारी भाषण करीत असताना झालेल्या या हल्ल्यात पाश्चिमात्य देशांचे नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पण काही वृत्तसंस्थांनी या हल्ल्यात चार जणांचा बळी गेल्याचा दावा केला.

सदर बॉम्ब हल्ला चढविणार्‍या दहशतवाद्याला सौदीच्या सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे. याआधी १२ दिवसांपूर्वी जेद्दाह येथील फ्रान्सच्या दूतावासाबाहेर तैनात सुरक्षा रक्षकाला अज्ञात हल्लेखोराने भोसकले होते. या हल्ल्यानंतर जेद्दाह येथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून सर्व दूतावासांसाठी अलर्ट जारी करण्यात आला होता.

leave a reply