अंकारा – शुक्रवारी पहाटे तुर्कीच्या दियारबकीर शहरात गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या मोटारीजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला. यामध्ये नऊ जण जखमी झाले असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याचे तुर्कीच्या यंत्रणांनी जाहीर केले. गेल्या महिन्यात तुर्कीच्या इस्तंबूल शहरात झालेल्या कारबॉम्बस्फोटासाठी कुर्द संघटना जबाबदार असल्याचा आरोप करून तुर्कीने सिरियात हल्ले चढविले होते.
येथील ऐन बाजारभागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारीमध्ये बॉम्ब पेरण्यात आला होता. तुर्कीच्या पोलिसांची मोटार जवळून जाताच हा स्फोट घडविण्यात आला. पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्यावर अजिबात गर्दी नव्हती. त्यामुळे जीवितहानी टळल्याचे तुर्कीच्या यंत्रणांनी सांगितले. या स्फोटासाठी कुठल्याही संघटनेवर आरोप करण्याचे तुर्कीने टाळले आहे. पण याआधी आपल्या देशात झालेल्या घातपाती हल्ल्यांसाठी तुर्कीने कुर्द संघटनांना जबाबदार धरले होते.
दरम्यान, दहशतवाद्यांच्या मुद्यावर कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नसल्याचे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी म्हटले होते. तसेच लवकरच सिरियातील कारवाई तीव्र करणार असल्याची घोषणा एर्दोगन यांनी केली होती.