इराण व चीनमधील तेढ वाढली

इराणच्या वर्तमानपत्रानेे तैवानच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले

तेहरान/तैपेई – ‘चीनने नेहमीच तैवानी जनतेचे अधिकार डावलले आहेत. स्वातंत्र्य हा तैवानचा न्याय्य अधिकार असून त्यांची ही मागणी मान्य करण्याशिवाय चीनसमोर इतर कुठलाही पर्याय नाही’, अशी जळजळीत टीका करणारी बातमी इराणच्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली. इराणमध्ये चीनविरोधात वाढत असलेला संताप या बातमीतून व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच इराणने चीनच्या राजदूतांना समन्स बजावले होते.

Iran and China चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आखाती देशांच्या दौऱ्यावर असताना पर्शियन समुद्रातील इराणच्या बेटांचा मुद्दा उपस्थित करून युएईची बाजू घेतली होती. या सागरी क्षेत्रातील ग्रेटर तूंब, लेसर तूंब आणि अबू मुसा या तीन बेटांवर इराण अधिकार सांगत आहे. पण राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी युएईच्या भूमिकेचे समर्थन करुन या बेटांबाबत वाटाघाटी सुरू कराव्या, अशी मागणी केली होती. यावर खवळलेल्या इराणने थेट चीनच्या राजदूतांना समन्स बजावले होते. यामुळे इराण व चीनमधील मैत्रीत तणाव निर्माण झाल्याचे बोलले जात होते.

या घटनेला आठवडा पूर्ण होत नाही, तोच इराणच्या ‘अरमान’ या वर्तमानपत्राने तैवानचा मुद्दा काढून चीनला डिवचले आहे. चीन दावा करीत असला तरी तैवानमधील जनता चीनविरोधात असल्याचे सांगून इराणच्या वर्तमानपत्राने काही सर्वेक्षणाचे आकडे प्रसिद्ध केले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर तैवानला मान्यता किंवा स्वतंत्र प्रतिनिधीत्व मिळू नये म्हणून चीनने केलेल्या कारवायांची माहितीच या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली आहे. इराणच्या वर्तमानपत्रातील ही बातमी चीनविरोधातील संताप व्यक्त करणारी ठरते आहे.

leave a reply