आंतरराष्ट्रीय चांद्रमोहिमेचा भाग असणार्‍या ‘आर्टेमिस ऍकॉर्डस्’वर ब्राझिलची स्वाक्षरी

- करारावर स्वाक्षरी करणारा पहिला लॅटिन अमेरिकी देश

वॉशिंग्टन/ब्रासिलिया – अमेरिकेची अंतराळसंस्था ‘नासा’च्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या ‘आर्टेमिस ऍकॉर्डस्’वर ब्राझिलने स्वाक्षरी केली आहे. या करारात चंद्रावरील अंतराळ मोहिमसेसह चंद्रावर असणारी खनिजसंपत्ती व इतर व्यावसायिक बाबींचाही समावेश आहे. आतापर्यंत या करारात अमेरिकेसह ११ देशांनी सहभाग नोंदविला असून ब्राझिल हा १२वा देश ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय चांद्रमोहिमेचा भाग असणार्‍या ‘आर्टेमिस ऍकॉर्डस्’वर ब्राझिलची स्वाक्षरी - करारावर स्वाक्षरी करणारा पहिला लॅटिन अमेरिकी देशगेल्या काही वर्षांपासून रशिया व चीन एकत्रितरितत्या अंतराळातील प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असून, ‘आर्टेमिस ऍकॉर्डस्’च्या माध्यमातून अमेरिका त्याविरोधात आघाडी तयार करीत आहे. अमेरिकी अंतराळसंस्था नासाकडून येत्या काही वर्षात चंद्रावर मोहीम पाठविण्यात येणार असून, त्यात चंद्रावर असणार्‍या खनिजसंपत्तीच्या अभ्यासाचाही समावेश असणार आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी इतर देशांचे सहकार्य घेण्याचा उद्देश ठेऊन नासाने ‘आर्टेमिस ऍकॉर्डस्’साठी पुढाकार घेतला आहे.

या करारासाठी नासाने १९६७ सालच्या ‘आऊटर स्पेस ट्रिटी’चा आधार घेतला आहे. जगातील सर्व देशांना चंद्रासह अंतराळातील इतर ग्रहांवर संशोधन करण्याचा समान अधिकार असेल, असे या आर्टेमिस करारात नमूद करण्यात आले आहे.

चंद्र, मंगळ व अंतराळातील लघुग्रहांवर मोठ्या प्रमाणात खनिजसंपत्ती असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी अमेरिका व युरोपसह अनेक देश उत्सुक असून या देशांमध्ये खनिजांच्या उत्खननासाठी विविध कंपन्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. या कंपन्यांकडून खनिज उत्खननासाठी परवानगी मिळावी यासाठी सातत्याने दबावही टाकण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय चांद्रमोहिमेचा भाग असणार्‍या ‘आर्टेमिस ऍकॉर्डस्’वर ब्राझिलची स्वाक्षरी - करारावर स्वाक्षरी करणारा पहिला लॅटिन अमेरिकी देशया पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने २०२० साली ‘आर्टेमिस ऍकॉर्डस्’ची संकल्पना मांडली होती. ऑक्टोबर २०२०मध्ये अमेरिकेसह आठ देशांच्या अंतराळसंस्थांनी ‘आर्टेमिस ऍकॉर्डस्’वर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. या देशांमध्ये ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, लक्झेंबर्ग, इटली व संयुक्त अरब अमिरातीचा समावेश होता. त्यानंतर गेल्या आठ महिन्यात दक्षिण कोरिया, न्यूझीलंड व युक्रेननेही करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. ब्राझिल हा करारात सहभागी होणारा १२वा तर लॅटिन अमेरिकेतील पहिलाच देश ठरला आहे.

या कराराच्या माध्यमातून ब्राझिल अंतराळातील खनिज उत्खनन व इतर संशोधनाला मान्यता देत आहे, असे नासाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले. ब्राझिलचे विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनमंत्री मार्कोस पॉन्टस यांनी करारावर स्वाक्षरी केली असून यावेळी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारोही उपस्थित होते. ब्राझिलच्या सहभागाचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी स्वागत केले आहे.

अमेरिकेच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या ‘आर्टेमिस ऍकॉर्डस्’वर रशिया व चीनने यापूर्वीच टीकास्त्र सोडले होते. अमेरिका याबाबत एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप या दोन्ही देशांनी केला आहे.

leave a reply