ब्रासिलिया – जगातिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) ‘पक्षपाती’ आणि ‘राजकीय’ असल्याचा ठपका ठेवून ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनी ब्राझील या संघटनेतून बाहेर पडेल, असा इशारा दिला आहे. तसेच ब्राझीलने आपल्या देशात कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि रुग्णांच्या संख्येचे आकडे सार्वजनिक करण्यासही नकार दिला आहे. रविवारी ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या वेबसाईटवरून देशातील कोरोनाच्या रुग्णांबाबत प्रत्येक मिनिटाची माहिती देणारा डॅशबोर्ड हटविला.
गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘डब्लूएचओ’बरोबरील अमेरिकेचे संबंध संपुष्टात येत असल्याची घोषणा केली होती. ‘डब्लूएचओ’ चीनच्या ‘पीआरओ’सारखे काम करीत असल्याचा ठपका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ठेवला होता. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनीही ‘डब्लूएचओ’वर पक्षपातीपणाचा आरोप लावला आहे. ”अमेरिकेने ‘डब्लूएचओ’ सोडले आहे आणि आम्हीही त्या दृष्टीने विचार करीत आहोत. एकतर ‘डब्लूएचओ’ने पक्षपातीपणा सोडवा, अन्यथा आम्ही ‘डब्लूएचओ’ सोडू”, असे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी म्हटले आहे.
ब्राझीलमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत ३६ हजार नागरिक कोरोनाने दगावले आहेत, तर सुमारे सात लाख रुग्ण या देशात आढळले आहेत. अमेरिकेनंतर सर्वाधिक रुग्ण ब्राझीलमध्ये आहेत. शुक्रवारी ‘डब्लूएचओ’ने ब्राझील आणि इतर लॅटिन अमेरिकन देशांना याबाबत सावध केले होते. कोरोनाव्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी घातलेले निर्बंध उठवले, तर ही साथ आणखी वेगाने पसरेल, असा इशारा दिला होता. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो देशात घातलेले निर्बध मागे घेण्याच्या तयारीत असताना ‘डब्लूएचओ’कडून हा इशारा देण्यात आला. यामुळे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष खवळल्याचे सांगितले जाते.
याशिवाय कोरोनावर उपचारासाठी हाइड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधांच्या वापरावर ‘डब्लूएचओ’ने टाकलेल्या बंदीवरूनही राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो ‘डब्लूएचओ’वर नाराज आहेत, असे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी ‘डब्लूएचओ’ने कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी हाइड्रॉक्सिक्लोरोक्वीन या मलेरियावरील औषधांच्या चाचण्या घेण्यावर बंदी घातली होती. या औषधांमुळे रुग्णांचा मृत्यू होण्याचा धोका असल्याचे एका संशोधन अहवालात दावा करण्यात आला होता.
मात्र ‘डब्लूएचओ’ने ज्या संशोधन अहवालाच्या आधारे हाइड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या चाचण्यावर बंदी घातली होती. त्यावरच आता प्रश्न उपस्थित होत आहेत. या संबंधीचा अहवाल संशोधकांनी मागे घेतला आहे. अशावेळी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी ‘डब्लूएचओ’वर निशाणा साधला आहे. ब्राझीलला भारताकडून हाइड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा करण्यात आला होता. ब्राझीलच्या जनतेसाठी हे औषध संजीवनी ठरेल असे सांगून राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी भारताचे आभार मानले होते.