धोरणात्मक सहकार्य ही भारत-ऑस्ट्रेलिया संबधांची आधारशिला – ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओ फॅरल

नवी दिल्ली – संरक्षण व धोरणात्मक सहकार्य ही भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संबंधांची आधारशिला ठरते, असे ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओ फॅरल यांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाव्हायरसची साथ आल्यानंतर उत्पादनासाठी चीनवर अवलंबून असलेल्या जगाला फार मोठा धडा मिळालेला असल्याचे संकेत देऊन भारत आणि ऑस्ट्रेलिया या आघाडीवर पुरवठ्याची साखळी उभारण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांनी व्यक्त केला आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया

नवी दिल्लीमध्ये ‘इंडिया ऑस्ट्रेलिया पार्टनरशिप इन द इंडो पॅसिफिक रिजन’ या विषयावर वेबिनार आयोजित केले होते. या वेबिनारमध्ये बोलताना ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले. इंडो पॅसिफिक क्षेत्राबाबत दोन्ही देशांचे ध्येय एकसमान असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी यावेळी ठासून सांगितले. मुक्त आणि खुले इंडो पॅसिफिक क्षेत्र भारत आणि ऑस्ट्रेलियाला अपेक्षित आहे, असे सांगून उभय देश यासाठी वचनबद्ध असल्याचे फॅरल यांनी स्पष्ट केले. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये नुकताच संपन्न झालेला ‘म्युच्युअल लॉजिस्टिक सपोर्ट एग्रीमेंट’ या कराराचा दाखला देऊन दोन्ही देशांचे सहकार्य नव्या उंचीवर पोहोचल्याचे उच्चायुक्तांनी म्हटले आहे.

दोन्ही देशांमध्ये झालेला हा करार ऐतिहासिक ठरतो असे सांगून उच्चायुक्तांनी त्याचे स्वागत केले आहे. त्याचवेळी कोरोनाव्हायरसच्या साथीनंतर उत्पादनासाठी चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या जगाला फार मोठा धडा मिळाला आहे, याकडे ऑस्ट्रेलियाचा उच्चायुक्तांनी लक्ष वेधले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यातून योग्य तो बोध घेऊन जगासाठी आवश्यक असलेले उत्पादन व पुरवठ्याची साखळी विकसित करतील दोन्ही देशांनी अशी इच्छा प्रदर्शित केली आहे, अशी माहिती यावेळी ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी दिली. वेगळ्या शब्दात जगाची फॅक्टरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनला पर्याय देण्यासाठी भारत व ऑस्ट्रेलिया हे सहकार्य करीत असल्याचे उच्चायुक्तांनी म्हटले आहे. एकाच दिवसांपूर्वी चीनने आपल्या नागरिकांना ऑस्ट्रेलियातील प्रवास टाळण्याची सूचना केली होती. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या निर्यातीवर चीनने बंदी घातल्याचे समोर आले होते. मात्र त्याची पर्वा न करता ऑस्ट्रेलियाने भारताबरोबरील सर्वच पातळ्यांवरील सहकार्य करून चीनला प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नाही तर भारताबरोबरील सहकार्य हा ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा भाग असल्याचे संदेश या देशाकडून सातत्याने दिले जात आहेत. ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी या परिसंवादातील आपल्या व्याख्यानात हीच बाब नव्याने अधोरेखित केली आहे.

leave a reply