नवी दिल्ली – ‘ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भारतभेटीची तयारी सुरू आहे. त्याचवेळी ब्रिटनही जी७ परिषदेसाठी भारताचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे’, असे भारतातील ब्रिटनचे नवे उच्चायुक्त एलेक्स एलिस यांनी म्हटले आहे. नुकतीच भारतात नियुक्ती झालेले उच्चायुक्त एलिस यांनी भारत व ब्रिटनमधील भागीदारी २०२१ सालात अधिक ठळकपणे जगासमोर आल्याचा दावा उच्चायुक्त एलिस यांनी केला.
ब्रिटनचे उच्चायुक्त म्हणून भारतात पदभार स्वीकारताना आपल्याला अतिशय आनंद होत असल्याचे हिंदीत सांगणारा व्हिडिओ एलेक्स एलिस यांनी प्रसिद्ध केला आहे. सध्या ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भारतभेटीची तयारी करणे हे आपल्याकडील सर्वात महत्त्वाचे काम असल्याचे एलिस म्हणाले. प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान भारताच्या भेटीवर येणार होते. पण ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या साथीचे संकट उद्भवल्याने त्यांची ही भारतभेट रद्द झाली होती. मात्र ब्रिटनमध्ये जून महिन्यात होणार्या जी७ च्या बैठकीआधी पंतप्रधान जॉन्सन भारतात येणार आहेत.
त्यांच्या या दौर्यात उभय देशांच्या द्विपक्षीय सहकार्यात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो. ब्रिटनमध्ये होणार्या जी७चे भारतालाही आमंत्रण आहे. यासाठी पंतप्रधान मोदी ब्रिटनला भेट देणार असल्याचे सांगितले जाते. ब्रिटनसह अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, इटली, जपान आणि युरोपिय महासंघ जी७च्या बैठकीत सहभागी होणार असून यासाठी भारताला मिळालेले आमंत्रण भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेला प्रभाव दाखवून देत असल्याचे दिसत आहे.