चीनचे इशारे धुडकावून ब्रिटनची ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ साऊथ चायना सीमध्ये दाखल

लंडन/बीजिंग – चीनने वारंवार दिलेले इशारे धुडकावून लावत ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ आपल्या ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’सह साऊथ चायना सीमध्ये दाखल झाली. ब्रिटीश नौदलाच्या या मोहिमेवर चिनी प्रसारमाध्यमे व विश्‍लेषकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, ब्रिटन अमेरिकेचा पाळलेला कुत्रा असल्याची संभावना ‘ग्लोबल टाईम्स’मधून करण्यात आली आहे. त्याचवेळी ब्रिटनला धमकावण्यासाठी चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने साऊथ चायना सीमध्ये एकाच वेळी दोन सरावांना सुरुवात केल्याचेही समोर आले आहे.

चीनचे इशारे धुडकावून ब्रिटनची ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ साऊथ चायना सीमध्ये दाखलगेल्या काही वर्षात साऊथ चायना सीमध्ये चीनच्या वाढत्या वर्चस्ववादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनने ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्राकडे अधिक लक्ष पुरविण्याचे संकेत दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून ब्रिटनने आपली नवी विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्वीन एलिझाबेथ’ साऊथ चायना सीमध्ये पाठविण्याचे जाहीर केले होते. ब्रिटनने ही घोषणा केल्यानंतर चीनने त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती. ब्रिटनच्या या मोहिमेमुळे दोन देशांमधील संबंधांना धक्का बसेल, असा इशारा चीनकडून देण्यात आला होता. गेल्या काही महिन्यात चीनने वारंवार या मुद्यावरून ब्रिटनवर दडपण आणण्याचेही प्रयत्न केले होते.

मात्र चीनचे दडपण व इशारे झुगारून देत मंगळवारी ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ तिच्या ‘कॅरिअर स्टाईक ग्रुप’सह साऊथ चायना सीमध्ये दाखल झाली. या ‘स्ट्राईक ग्रुप’मध्ये सहा विनाशिका, दोन ‘ऑक्झिलरी शिप्स’, एक पाणबुडी यांचा समावेश आहे. ‘एचएमएस क्वीन एलिझाबेथ’वर आठ ‘एफ-35बी’ लढाऊ विमाने, चार ‘वाईल्डकॅट मेरिटाईम अटॅक हेलिकॉप्टर्स’, सात ‘मर्लिन एमके2 अँटी सबमरिन अ‍ॅण्ड एअरबोर्न अर्ली वॉर्निंग हेलिकॉप्टर्स’ व तीन ‘मर्लिन एमके4 कमांडो हेलिकॉप्टर्स’ तैनात आहेत.

ब्रिटीश नौदलाचा ‘कॅरिअर स्टाईक ग्रुप’ची साऊथ चायना सीमधील मोहिम हा ‘फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन ऑपरेशन’चा भाग असल्याचे ब्रिटनकडून सांगण्यात आले आहे. साऊथ चायना सी क्षेत्रात दाखल होण्यापूर्वी ब्रिटीश नौदलाने भारत तसेच सिंगापूरच्या नौदलांबरोबर युद्धसराव केल्याची माहितीही ब्रिटनच्या संरक्षण विभागाकडून देण्यात आली. साऊथ चायना सीमधून ब्रिटीश विमानवाहू युद्धनौका व स्ट्राईक ग्रुप पुढे जपानला भेट देईल, अशी माहिती ब्रिटीश संरक्षणमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती.

ब्रिटीश नौदलाच्या मोहिमेने चीन चांगलाच बिथरला असून चिनी प्रसारमाध्यमे व विश्‍लेषकांनी ब्रिटनविरोधात आगपाखड सुरू केली आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र असणार्‍या ‘ग्लोबल टाईम्स’ने ब्रिटन हा अमेरिकेचा पाळलेला कुत्रा आहे, अशा शब्दात संभावना केली आहे. त्याचवेळी ब्रिटनची मोहीम त्या देशाची वसाहतवादी मानसिकता दाखवून देणारा ठरतो, अशी टीकाही केली. चीनच्या एका विश्‍लेषकाने ब्रिटीश नौदलाची दुरावस्था झाल्याचे दावे केले असून, साऊथ चायना सीमध्ये येण्यापूर्वी 100हून अधिक ब्रिटीश खलाशांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, याकडेही लक्ष वेधले.

दुसर्‍या बाजूला ब्रिटीश नौदलाची मोहीम सुरळीत पार पडू नये म्हणून चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने साऊथ चायना सीमध्ये दोन युद्धसराव एकाच वेळी सुरू केले आहेत. सरावांच्या नजिकच्या क्षेत्रात इतर हालचालींना प्रतिबंध घालण्यात आला असून, त्याचे उल्लंघन करणार्‍यांना प्रत्युत्तर दिले जाईल, असे बजावले आहे. त्याचवेळी ब्रिटीश नौदलाच्या ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’वर बारीक लक्ष ठेवले जाईल, असेही चीनच्या लष्कराकडून सांगण्यात आले.

leave a reply