ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन भारताच्या भेटीवर

ब्रिटनचे पंतप्रधान अहमदाबाद – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारताच्या भेटीवर आले आहेत. गुजरातमधील महात्मा गांधीजींच्या साबरमती आश्रमापासून त्यांच्या या भारत दौऱ्याची सुरूवात झाली. अहमदाबादमध्ये पंतप्रधान जॉन्सन यांची उद्योजकांशी चर्चा पार पडली. तसेच गुजरातमधील ब्रिटिश कंपनीच्या प्रकल्पाची यावेळी पंतप्रधान जॉन्सन यांनी पाहणी केली. दरम्यान, पंतप्रधान जॉन्सन यांच्या या भेटीत भारत व ब्रिटनमध्ये मुक्त व्यापारी करारावर सहमती होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

युक्रेनचे युद्ध पेटलेले असताना, ब्रिटनच्या पंतप्रधानांचा हा भारत दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरतो. भारताने रशियाबरोबर सहकार्य वाढवू नये, अशी अपेक्षा ब्रिटनचे पंतप्रधान व्यक्त करतील, असे दावे करण्यात येत हेोते. मात्र आपण या विषयावर व्याख्यान द्यायला भारतात आलो नाही, असे सांगून पंतप्रधान जॉन्सन यांनी आपल्याला भारत व रशियामधील ऐतिहासिक संबंधांची आपल्याला जाणीव असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी आपल्या या दौऱ्याचा हेतू भारताबरोबरील राजकीय तसेच व्यापारी सहकार्य दृढ करणे, हा असल्याचे जॉन्सन यांनी स्पष्ट केले.

5जी तंत्रज्ञानापासून ते आर्टिफिशल इंटेलिजन्सपर्यंतच्या सर्वच क्षेत्रात भारताशी सहकार्य करण्यास ब्रिटन उत्सूक आहे. याद्वारे दोन्ही देशांच्या जनतेसाठी रोजगारनिर्मिती, विकास व नव्या संधी उपलब्ध करून देण्यावर ब्रिटन काम करील, असे पंतप्रधान जॉन्सन यांनी स्पष्ट केले. भारताच्या ब्रिटनबरोबरील सहकार्यामुळे ब्रिटनमध्ये सुमारे 11 हजार नोकऱ्यांची निर्मिती होईल, अशी माहिती भारतातील ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाने दिली आहे.

दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापारी करारावर आत्तापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या पार पडलेल्या आहेत. या चर्चेची पुढची फेरी पुढच्या आठवड्यात संपन्न होईल. भारताने ऑस्ट्रेलियाबरोबर मुक्त व्यापारी करार केल्यानंतर, ब्रिटनही भारताबरोबर हा करार करण्यासाठी अधिक वेगाने प्रयत्न करीत असल्याचे दिसते.

leave a reply