पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

– दोन आत्मघाती हल्लेखोरांसह सहा दहशतवादी ठार
– सीआयएसएफचा अधिकारी शहीद, 9 जवान जखमी

जम्मू – जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येथे होणारी पंतप्रधानांची रॅली उधळून लावण्यासाठी पुलवामासारखा मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या प्रयत्नात दहशतवादी संघटना असल्याचे उघड झाले होते. शुक्रवारी पहाटे जम्मूमधील सुंजवान येथील लष्कराच्या तळाजवळ सीआयएसएफच्या ताफ्यावर झालेला हल्ला या भयंकर कटाची साक्ष देणारा ठरत आहे.

दहशतवादी हल्ल्याचा कटशुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात सीआयएसएफचा अधिकारी शहीद झाला. तसेच 9 जवान या भ्याड हल्ल्यात जखमी झाले. मात्र यानंतर चकमकीत ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दोन्ही आत्मघाती हल्लेखोरांना ठार करण्यात आले. हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी आहेत. तर गेल्या चोवीस तासात सुरक्षा दलांच्या कारवाईत एकूण सहा दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये ‘लश्कर-ए-तोयबा’च्या चार दहशतवाद्यांचा समावेश आहे.

शुक्रवारी पहाटे 4.30च्या सुमारास सुंजवान येथील लष्कराच्या तळाजवळ सीआयएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर ‘जैश’च्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. हे दहशतवादी लष्कर तळाच्या दिशेने जात होते. यावेळेला लष्कराच्या मुख्यद्वारावर तैनात जवानांची ड्यूटी बदलत असते. याचा फायदा घेऊन हल्ला घडविण्याचा कट होता, असे प्राथमिक तपासात लक्षात आले आहे. मात्र हे दहशतवादी लष्कराच्या तळाच्या दिशेने जात असताना त्यावेळी तेथे सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्सच्या (सीआयएसएफ) जवानांना घेऊन बस येथून जात होती. यानंतर दहशतवाद्यांनी याच सीआयएसएफच्या बसला लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी बसवर ग्रेनेड फेकले. त्यानंतर बेछूट गोळीबार सुरू केला. यामध्ये सीएआयएसएचे उपनिरीक्षक एस.पी.पटेल हे शहीद झाले. तर दोन जवान गंभीर रित्या जखमी झाले. या हल्ल्यानंतर सीआयएसएफच्या जवानांनी ताबडतोब जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दहशतवाद्यांना येथून पळ काढावा लागला. दहशतवादी जवळच्या गावाच्या दिशेने गेल्याचे लक्षात येताच ह्या संपूर्ण भागाला वेढा देण्यात आला. जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कराची अतिरिक्त कुमक येथे पाठविण्यात आली. तसेच या ऑपरेशनमध्ये सीआयएसएफचे जवानही सहभागी झाले होते. दहशतवादी येथे जवळच असलेल्या एका घरात घुसले. घरातील सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात सुरक्षादलांना यश मिळाले. तर एक दहशतवादी या ऑपरेशनच्या सुरुवातीलाच ठार झाला. मात्र दुसऱ्या दहशतवाद्याबरोबर बराच काळ चकमक सुरू होती. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्र व स्फोटके असल्याने ही चकमक पाच तास लांबल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

या दहशतवाद्यांची ओळख पटविण्यात येत आहे. मात्र हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे व काही दिवसांपूर्वीच भारतात घुसखोरी आल्याचा संशय व्यक्त केला जातो. चकमकीच्या ठिकाणाहून तीन शस्त्र व मोठ्या प्रमाणावर ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी चकमकीदरम्यान केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात आणखी काही जवान जखमी झाले. एकूण 9 जवान जखमी झाले असून यामध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे.

याआधी गुरुवारी बारामुल्लामध्ये मोहम्मद युसूफ कांतरू हा लश्कर-ए-तोयबाचा कमांडर चकमकीत ठार झाला होता. सुरक्षादलाच्या जवानांच्या हत्या व स्थानिकांवरील हल्ल्यामध्ये सूत्रधारांपैकी तो एक होता. या चकमकीत त्याच्या साथीदारालाही ठार करण्यात आले होते. तर त्याच्या इतर दोन साथीदारांबरोबर चकमक सुरू होती. ही चकमक शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू होती. चोवीस तासाच्या दीर्घ चकमकीनंतर या दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. त्यामुळे बारामुल्लातील चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. तर गेल्या चोवीस तासात एकूण सहा दहशतवादी ठार झाले आहेत.

leave a reply