इस्रायली जहाजावरील हल्लेखोरांवर कारवाईसाठी ब्रिटनचे स्पेशल फोर्सेस येमेनमध्ये दाखल

येमेनमध्ये दाखलतेहरान – ब्रिटनच्या लष्करातील स्पेशल फोर्सेसच्या ४० जवानांचे पथक येमेनमध्ये दाखल झाले. गेल्या महिन्यात ओमानच्या सागरी क्षेत्रात इस्रायलच्या इंधनवाहू जहाजावर ड्रोन हल्ले चढविणार्‍यांवर ब्रिटीश स्पेशल फोर्सेस कारवाई करणार असल्याचा दावा केला जातो. या हल्ल्यामागे इराण असल्याचा आरोप इस्रायल, अमेरिका, ब्रिटन आणि युरोपिय महासंघानेही केला होता. तर इराणने हे आरोप फेटाळले होते. दरम्यान, येमेनमधील ब्रिटनच्या या तैनातीवर इराणने टीका केली. तसेच पर्शियन आखात ही आपल्या देशासाठी ‘रेड लाईन’ असल्याचा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

‘स्पेशल एअर सर्व्हिस’ (सास) म्हणून ओळखल्या जाणार्‍या ब्रिटनच्या स्पेशल फोर्सेसचे जवान येमेनच्या पूर्वेकडील भागात उतरल्याची बातमी ब्रिटनच्या वर्तमानपत्राने दिली. या ४० जणांच्या पथकात पथकामध्ये ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’ हाताळणार्‍या जवानांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. इस्रायलच्या इंधनवाहू जहाजावरील ड्रोन हल्ल्यासाठी जबाबदार असणार्‍यांना धडा शिकविण्याची जबाबदारी या पथकावर आहे. यासाठी ब्रिटनच्या स्पेशल फोर्सेसना ‘लोकल हँडलर्स’चे सहाय्य मिळेल, असे ब्रिटीश वर्तमानपत्राचे म्हणणे आहे.

येमेनमध्ये दाखल३० जुलै रोजी ओमानच्या दुक्कम बंदरापासून १५२ सागरी मैल अंतरावरुन प्रवास करणार्‍या इस्रायलच्या ‘मर्सर स्ट्रीट’ इंधनवाहू जहाजावर ड्रोन हल्ले झाले होते. या ड्रोन हल्ल्यात दोघांचा बळी गेला होता. यामध्ये ब्रिटीश व रोमानियन नागरिकाचा समावेश होता. या हल्ल्यासाठी इराण किंवा इराणसमर्थक गट असल्याचा आरोप इस्रायल, अमेरिका, ब्रिटनने केला होता. आपल्याकडे यासंबंधीचे पुरावे असल्याचे इस्रायलने सांगितले होते. रविवारी युरोपिय महासंघानेही समोर आलेल्या पुराव्यानुसार, या हल्ल्यामागे इराण असल्याचा ठपका ठेवला होता.

ब्रिटनने मर्सर स्ट्रीटवरील हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. इस्रायलने या हल्ल्याला योग्य ते उत्तर देण्याची घोषणा केली. तर गेल्या काही महिन्यांपासून पर्शियन आखातात तैनात असलेल्या आपल्या स्पेशल फोर्सेसना इराणमध्ये घुसवून, या हल्ल्यासाठी जबाबदार असलेले ड्रोन सेंटर उद्ध्वस्त केले जाईल, असा इशारा ब्रिटनने दिला होता. अशा परिस्थितीत ब्रिटनच्या स्पेशल फोर्सेसच्या जवानांची येमेनमधील तैनाती लक्षवेधी ठरते. याबरोबरच ब्रिटनने सोमवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सागरी सुरक्षेच्या मुद्यावर बोलताना मर्सर स्ट्रीटवरील हल्ल्याचा दाखला देऊन, इराणमुळे पर्शियन आखाताची सुरक्षा धोक्यात आल्याचा ठपका ठेवला होता.

यावर इराणची प्रतिक्रिया आली आहे. ब्रिटनने इराणवर केलेले आरोप नवे नाहीत. अलिकडच्या काळात ब्रिटनच्या नेत्यांनी इराणविरोधात केलेल्या बेजबाबदार आरोपांच्या मालिकेचा हा पुढचा भाग ठरतो’, अशी टीका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. तसेच ‘पर्शियन आखाताची सुरक्षा इराणसाठी रेड लाईन असून ब्रिटनसारख्या देशांपासून या सागरी मार्गाच्या सुरक्षेसाठी इराण पूर्णपणे सज्ज आहे’, असा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

leave a reply