‘बीएसएफ’ने शस्त्र तस्करी करणारे पाकिस्तानी ड्रोन पाडले

कठुआ – काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानचे शस्त्रास्त्र तस्करी करणारे ड्रोन पडून ‘बीएसएफ’ने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. अमेरिकन बनावटीच्या ‘एम ४’ रायफलसह सात ग्रेनेड आणि इतर शस्त्रसाठा या ड्रोनद्वारे तस्करी करण्यात येत होता. पाकिस्तान मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याच्या प्रयत्नात असल्याचे ‘बीएसएफ’चे महानिरीक्षक एन.एस. जामवाल यांनी म्हटले आहे. तसेच हे ड्रोन सीमेपलीकडील पाकिस्तानी चौक्यांमधून पाकिस्तानी रेंजर्सकडूनच हाताळले जात असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

BSFशनिवारी पहाटे ५ च्या सुमारास कठुआमधील हिरानगर सेक्टरच्या रथुआ परिसरात सीमासुरक्षादलाचे पथक गस्त घालत असताना त्यांच्या दृष्टीस हे ड्रोन पडले. आंतरराष्ट्रीय सीमेपासून भारतीय हद्दीत २५० मीटर आतमध्ये हे ड्रोन शिरले होते. ड्रोनचा वेध घेत उपनिरीक्षक देवेंदरसिंह यांनी नऊ एमएम बॅरेटच्या आठ राउंड गोळ्या झाडल्या व हे ड्रोन पाडण्यात आले. पानसरजवळ एका शेतात हे ड्रोन पाडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या ड्रोनवर ‘एम ४’ ही अमेरिकन बनावटीची रायफल, सात एम६७ ग्रेनेड, दोन मॅगझीन, ६० राऊंड सापडल्याची माहिती ‘बीएसएफ’चे जम्मू फ्रंटियरचे महानिरीक्षक एन. एस. जामवाल यांनी दिली. या ड्रोनचा आकार ८ फुट इतका आहे. तस्करीसाठी आणि सुरक्षादलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पाकिस्तनकडून ड्रोनचा वापर करण्यात येतो.

गेल्यावर्षी ९ ते १६ सप्टेंबरमध्ये अमृतसर आणि तरनतारण जिल्ह्यात करण्यात आलेल्या कारवाईत ८० किलो दारूगोळा जप्त करण्यात आला होता. हा शस्त्रसाठा ड्रोनच्या सहाय्याने पाठविण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानने भारतात शस्त्र तस्करीसाठी ड्रोनचा वापर सुरु केल्याचे लक्षात आले होते. पंजाब आणि काश्मीरच्या सीमेवर त्यानंतर अनेकवेळा पाकिस्तानी ड्रोन दिसून आले आहे. गेल्याच महिन्यात राजौरीमध्ये सुरक्षा ठिकाणांची टेहळणी करणारे ड्रोन जप्त करण्यात आले होते.

भारत आणि चीनमध्ये वाढलेल्या तणावाचा फायदा पाकिस्तान उचलण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांच्या घुसविण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नियंत्रण रेषेबरोबर आंतरराष्ट्रीय सीमेवरही अलर्ट देण्यात आला होता. त्यानंतर ‘बीएसएफ’ने आंतरराष्ट्रीय सीमेवरही गस्त आणि तैनाती वाढविली होती. शनिवारी आंतराष्ट्रीय सीमेतून ड्रोनद्वारे तस्करीच्या या घटनेमुळे ही बाब अधिक स्पष्ट झाली आहे. ही शस्त्रे जम्मू- काश्मीरमधील पाकिस्तानच्या ज्या हस्तकांपर्यंत पोहोचविण्यात येणार होती, त्याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, पाकिस्तानकडून बारामुल्लामध्ये गोळीबार आणि मोर्टर्स हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात चार नागरिक जखमी झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अब्दुल कयूम म्हणाले.

leave a reply