भारत-चीन सहकार्याच्या संधींवर आव्हानांनी मात केली

- भारताचे राजदूत विक्रम मिसरी यांनी चीनला सुनावले

बीजिंग/नवी दिल्ली – ‘भारत व चीन संबंधांमध्ये संधी व आव्हाने या दोन्हींचा समावेश आहे. गेल्या वर्षभरातील द्विपक्षीय संबंधांचा विचार करता काही आव्हाने संधींपेक्षा वरचढ ठरली’, अशी परखड भूमिका भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिसरी यांनी मांडली. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याबरोबर झालेल्या व्हर्च्युअल चर्चेत मिसरी यांनी हे वक्तव्य केल्याचे भारतीय दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मिसरी यांनी आव्हानांसंदर्भात केलेल्या उल्लेखामागे लडाखच्या एलएसीवरील तणावाचा संदर्भ आहे.

भारत-चीन सहकार्याच्या संधींवर आव्हानांनी मात केली - भारताचे राजदूत विक्रम मिसरी यांनी चीनला सुनावलेभारत व चीनमध्ये सर्व स्तरावर योग्य संपर्क व संवाद राहिल, अशी अपेक्षा राजदूत मिसरी यांनी व्यक्त केली. ‘राजकीय तसेच राजनैतिक पातळीसह लष्करी पातळीवरील संवाद कायम ठेऊन दोन्ही देश सध्या निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढतील, अशी आशा आहे. दोन्ही देशांमधील संबंध सकारात्मक दिशेने नेण्यासाठी हे आवश्यक असेल’, असे मिसरी पुढे म्हणाले.

भारतीय दूतावासाने दिलेल्या निवेदनात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात झालेल्या चर्चेचा उल्लेख करण्यात आला आहे. या चर्चेतून निघालेल्या निष्कर्षांवर भर देत दोन देशांमधील मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी हाच मार्ग योग्य ठरेल, असे भारतीय राजदूतांनी अधोरेखित केल्याचे दूतावासाने म्हटले आहे. यावेळी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भविष्यात भारत-चीन संबंधांमध्ये प्रगती होईल, असा विश्‍वास व्यक्त केल्याची माहिती दूतावासाने दिली. दरम्यान, लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी लवकरच भारत व चीनच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये चर्चेची नवी फेरी पार पडेल. मात्र या चर्चेतून फारसे काही हाती लागण्याची शक्यता नाही.

एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत चीनकडे करीत असलेली मागणी अवास्तव असल्याचा आरोप चीनने केला होता. तर चीनची एलएसीबाबतची भूमिका हटवादी असून यामुळे तणाव कमी होणे शक्यच नाही, असे भारताचे म्हणणे आहे. मात्र सीमेवर तणाव कायम ठेवूनही भारत व चीन एकमेकांशी सहकार्य कायम ठेवू शकतात, अशी अपेक्षा चीन व्यक्त करीत आहे. मात्र एलएसीवर हजारो सैनिक एकमेकांच्या समोर खडे ठाकलेले असताना, चीन भारताकडून व्यापारी तसेच अन्य पातळ्यांवर सहकार्याची मागणी करू शकत नाही, हे भारत चीनला वारंवार बजावत आला आहे.

चीनमधील भारताच्या राजदूतांनी या देशाचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांना याची परखडपणे जाणीव करून दिल्याचे दिसते.

leave a reply